अभिनेता शाहरुख (Shahrukh khan) खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल फोटोत शाहरुख सफेद रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत असून टी-शर्टवर ‘Vote for MIM’ असे लिहिलेले बघायला मिळतेय. दावा करण्यात येतोय की शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना ओवेसींच्या एमआयएम (MIM) पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
फेसबुकवर देखील हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील आणि सचिन शिंदे यांनी सदर दावे व्हॉट्सऍप वरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
शाहरुख खानने (Shahrukh khan) ओवेसींच्या एमआयएम (MIM) पक्षाला समर्थन दिल्याच्या किंवा या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केल्याची कुठलीही बातमी उपलब्ध नाही. त्यामुळे फोटो नेमका कुठला आहे, हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने या फोटोचा शोध घेतला.
आम्हाला ‘बॉलिवूड हंगामा’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीमध्ये हाच फोटो बघायला मिळाला. मात्र बातमीतील फोटोत शाहरुख केवळ सफेद शर्टमध्ये दिसतोय. या शर्टवर एमआयएमला मतदान करण्याचे तर नाहीच नाही, इतरही कुठले आवाहन करण्यात आलेले नाही.
स्टॉक फोटो ‘गेट्टी इमेजेस’च्या वेबसाईटवर देखील आम्हाला हाच फोटो बघायला मिळाला. या फोटोत देखील शर्टवर कुठलंही प्रिंट नाही. शर्ट अगदीच प्लेन असल्याचे बघायला मिळतेय.
वेबसाईटवरील माहितीनुसार शाहरुख खानचा हा फोटो २००९ मधील म्हणजेच जवळपास १२ वर्षांपूर्वीचा आहे. शाहरुखने ‘ब्लू’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेता अक्षय खानची भेट घेतली. त्यावेळचा हा फोटो आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेता शाहरुख खानने ओवेसींच्या एमआयएम पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही. शाहरुखचा जवळपास १२ वर्षांपूर्वीचा फोटो एडिट करून त्याआधारे चुकीचे दावे केले जाताहेत.
हेही वाचा- शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर एनसीबीची धाड?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment