शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटांमध्ये खरी शिवसेना नेमकी कुणाची यावरून रस्सीखेच सुरु असल्याचे बघायला मिळतेय. दोन्हीही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याच्या दाव्यासह शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निशाणीवर दावा सांगितला जातोय.
सोशल मीडियावर मात्र कथितरित्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या बातमीचे म्हणून एक ग्राफिक व्हायरल होतेय. या ग्राफिकमध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे सांगितल्याचा दावा केला जातोय.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्य सुजितसिंग ठाकूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ग्राफिक ट्विट केले आहे.
फेसबुकवर देखील हे ग्राफिक मोठ्या प्रमाणात शेअर केले जातेय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही किवर्डसच्या साहाय्याने कथितरित्या लोकसत्ताची म्हणून शेअर केली जात असलेली बातमी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया चॅनेल्सवर संजय राऊतांचे असे कुठलेही वक्तव्य बघायला मिळाले नाही.
त्यानंतर आम्ही व्हायरल ग्राफिक्स रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधले असता लोकसत्ताच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून 8 जुलै 2022 रोजी करण्यात आलेले ट्विट बघायला मिळाले. संजय राऊत यांच्या ट्विट संदर्भातील ही बातमी आहे. “जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो ‘पाने’ के लिए बहुत कुछ होता है” असे ट्विट राऊत यांनी केले होते.
राऊत यांच्या याच ट्विट संदर्भातील ग्राफिक एडिट करण्यात आले असून त्या ठिकाणी “धनुष्यबाण निशाणी गेली तरी काही फरक पडत नाही. वेळ पडली तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवणार” हे नव्याने जोडण्यात आले आहे.
व्हायरल ग्राफिक आणि लोकसत्ताच्या मूळ बातमीचे ग्राफिक बघितल्यास आपल्याला लक्षात येईल की व्हायरल ग्राफिकमध्ये संजय राऊत यांच्या मूळ विधानाशी छेडछाड करण्यात आली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की संजय राऊत यांनी ‘धनुष्यबाणा’ची निशाणी गेल्यास शिवसेना पुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचे वक्तव्य केलेले नाही. सोशल मीडियातील लोकसत्ताच्या बातमीचे म्हणून व्हायरल होत असलेले ग्राफिक एडिटेड आहे.
हेही वाचा- अर्णब गोस्वामी यांनी बेधुंद डान्स करत साजरा केला उद्धव ठाकरेंचे सरकार पडल्याचा आनंद? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]