शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत बहुतांश खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतेय. या ग्राफिकमध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रपती युपीएचाच होणार असल्याचे म्हंटले असल्याचा दावा केला जातोय.
शिवसेनेचे खासदार काही म्हणू देत, त्याला मी महत्त्व देत नाही. मी म्हणतो ना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा. मी पवार साहेबांना शब्द दिला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितल्याचा दावा करणारे कथितरित्या लोकसत्ताच्या बातमीचे हे ग्राफिक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही लोकसत्ताच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सवर संजय राऊत यांचे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात हे विधान शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला संजय राऊतांनी युपीएचाच राष्ट्रपती होणार, असे म्हण्टल्याची एकही बातमी बघायला भेटली नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेल्या पाठिंब्याविषयी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या ग्राफिकचे मूळ शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला लोकसत्ताच्या ट्विटर हॅन्डलवरून 10 जुलै 2022 रोजी करण्यात आलेले ट्विट बघायला मिळाले.
लोकसत्ताच्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे श्रेष्ठी दिल्लीत असल्याचे सांगितले होते. बंडखोर गटाचे मुखवटे हळूहळू गळून पडत असल्याचे सांगतानाच एकनाथ शिंदे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून आता ते भाजपचे मुख्यमंत्री असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले होते. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
लोकसत्ताच्या हेच ट्विट एडिट करण्यात आले असून राऊत यांच्या मूळ विधानाच्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार काही म्हणू देत, त्याला मी महत्त्व देत नाही. मी म्हणतो ना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा. मी पवार साहेबांना शब्द दिला आहे, असे नव्याने जोडण्यात आले आहे.
व्हायरल ग्राफिक आणि लोकसत्ताचे मूळ ग्राफिक बघितल्यास लक्षात येईल की व्हायरल ग्राफिकमध्ये संजय राऊत यांच्या मूळ विधानाशी आणि बॅकग्राउंड फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. ग्राफिकमधील इतर गोष्टी समान आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राष्ट्रपती युपीएचाच होणार असल्याचे विधान दिलेले नाही. सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिक एडिटेड आहे. संजय राऊत यांच्या मूळ विधानाशी छेडछाड करण्यात आली असून एडिटेड ग्राफिकच्या आधारे चुकीचे दावे व्हायरल होताहेत.
हेही वाचा- ‘धनुष्यबाणा’ची निशाणी गेल्यास राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवणार शिवसेना?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment