सोशल मीडियावर एक व्हॉट्सएप स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. स्क्रिनशॉटमध्ये कथितरित्या विक्रोळी वेस्टच्या साई बालाजी पेट्रोल पंपाचे (sai balaji petroleum vikhroli west) बिल बघायला मिळतेय. या बिलाच्या अगदी खालच्या बाजूला ‘पेट्रोलच्या किंमती कमी व्हाव्यात अशी इच्छा असेल तर पुन्हा मोदींना मतदान करू नका”
व्हायरल स्क्रिनशॉटसोबत दावा केला जातोय की मोदींना हरवण्यासाठी विरोधकांकडून अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेट्रोल पंपचालक बदमाशी करताहेत.
मोदींना मतदान न केल्यास कमी किमतींमध्ये पेट्रोल देण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याचे देखील या दाव्यात सांगण्यात आले आहे. यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पेट्रोल पंप चालकाचे लायसन्स रद्द व्हायला हवे, अशी मागणी केली जात आहे.
फेसबुकवर हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
- व्हायरल स्क्रिनशॉटनुसार विक्रोळी येथील साई बालाजी पेट्रोलियम HPL कडून (sai balaji petroleum vikhroli west) मोदींना मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले जातेय.
- पहिली चूक यातच आहे की भारतात अद्यापपर्यंत तरी HPL नावाची कुठलीही पेट्रोल पुरवठा करणारी कंपनी कार्यरत नाही. भारतात HPCL अर्थात ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाच्या कंपनीमार्फत पेट्रोलचा पुरवठा केला जातो.
- पडताळणी दरम्यान आम्हाला खुद्द HPCL कडूनच विक्रोळीमध्ये किंवा मुंबईमध्ये HPCL चे रिटेल आउटलेट नसल्याचे स्पष्ट करणारे ट्विट देखील आढळून आले.
- HPCL च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दि. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी हे ट्विट करण्यात आले होते. २०१८ मध्ये ज्यावेळी प्रथम हा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता, त्यावेळीच HPCL कडून यासंदर्भात स्पष्टीकरण जारी करण्यात आले होते.
- सहाजिकच हा स्क्रिनशॉट एडिटेड असल्याचे स्पष्ट होते. परंतु हा स्क्रिनशॉट खरा आहे असे मानायचे ठरवले तरी, स्क्रिनशॉटमध्ये संबंधित बिल ४ ऑगस्ट २०१८ रोजीचे असल्याचे दिसतेय.
- त्यावेळी राज्यात महाआघाडीचे नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सेना-भाजप युतीचे सरकार होते. म्हणजेच या परिस्थितीत देखील महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या दबावाखाली पेट्रोल पंप चालक लबाडी करत असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पेट्रोलच्या किंमती घटविण्यासाठी पुन्हा मोदींना मतदान न करण्याचे आवाहन करणारा व्हायरल स्क्रिनशॉट एडिटेड असून त्या सोबत केले जाणारे दावे देखील फेक आहेत.
हेही वाचा- भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी शेअर केला फिलिपिन्सचा फोटो!
Be First to Comment