सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोसोबत दावा केला जातोय की बिहारमधील बेगुसराय भागातील मुंगेरगंज येथील ऋतुराज चौधरीने (Rituraj Chaudhary) गुगल हॅक केल्यानंतर गुगलच्या जगभरातील अधिकाऱ्यांची झोप उडाली. त्यानंतर लगेचच गुगलकडून ऋतुराजला 3.66 करोड पॅकेजच्या नोकरीचे जॉइनिंग लेटर देण्यात आले.
फेसबुकवरील व्हायरल मेसेजमध्ये असा देखील दावा करण्यात आलाय की IIT मणिपूरमध्ये द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या ऋतुराजकडे पासपोर्ट नव्हता. मात्र, गुगलच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारशी बोलणी करून अवघ्या 2 तासात त्याचा पासपोर्ट बनवून घेतला आणि आता तो प्रायव्हेट जेटने अमेरिकेला जाणार आहे.
हेच दावे ‘व्हॉट्सऍप’वरही जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. अशोक सोनवणे, निशिकांत गोळे, सागर पोवार, राजू खरे, शैलजा बारुरे आणि सुनीत अनगळ यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
सर्वप्रथम गुगलवर ऋतुराज चौधरीविषयी शोध घेतला असता अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले, ज्यामध्ये ऋतुराजने गुगलच्या सुरक्षेमधील तांत्रिक चूक शोधून काढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुगलकडून देखील ही चूक स्वीकारण्यात आली असून या चुकीचा त्यांच्या संशोधनात समावेश करण्यात आला आहे.
गुगलच्या सुरक्षेत त्रुटी शोधणाऱ्या बेगुसरायच्या ऋतुराज चौधरीला आता गुगलकडून बक्षिसाने सन्मानित देखील करण्यात येणार आहे. शिवाय गुगलने आपल्या ऋतुराजचा संशोधकांच्या यादीत समावेश केला आहे. गुगलच्या बगहंटर्स वेबसाईटवर ऋतुराजचा उल्लेख बघायला मिळतोय.
ऋतुराजला कोटींच्या पॅकेजची नोकरी?
ईटीव्ही भारतच्या बातमीनुसार स्वतः ऋतुराजनेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले कोटींच्या पॅकेजच्या नोकरीचे किंवा अमेरिकावारीचे दावे चुकीचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यामध्ये तसेच मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांच्या बातम्यांमध्ये देखील ऋतुराज IIT मणिपूरचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र स्वतः ऋतुराजनेच आपण IIT नव्हे, तर IIIT मणिपूर मध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगितले आहे. महत्वाची गोष्ट अशी की मणिपूरमध्ये IIT नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील ऋतुराज चौधरीने गुगल हॅक केल्याचा व्हायरल दावा चुकीचा आहे. ऋतुराजने गुगल हॅक केले नसून गुगलच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक तांत्रिक चूक शोधून काढली आहे. शिवाय ऋतुराजला गुगलकडून कोटींच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळालेली नाही. ऋतुराजच्या पासपोर्ट आणि अमेरिकावारी संदर्भातील दावे देखील चुकीचे आहेत. स्वतः ऋतुराजनेच हे दावे फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा-लता मंगेशकरांच्या पार्थिव देहावर शाहरुख खान थुंकला? वाचा व्हायरल दाव्यांचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment