Press "Enter" to skip to content

मुकेश अंबानींच्या ‘जिओ’ने 18 रुपये किलोचा गहू 50-60 रुपये प्रति किलोने विकायला सुरु केलाय?

दिल्ली-हरयाणा सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संदर्भात अनेक दावे केली जाताहेत. सध्या सोशल मीडियावर दावा केला जातोय की मध्य प्रदेशातील गव्हाची सरकारी खरेदी बंद झाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स जिओ’ने शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी (jio wheat) सुरु केली आहे. जिओकडून गहू 18 रुपये किलोने खरेदी केले जात असून ते बाजारात 50-60 रुपये प्रति किलो दराने विकले जाताहेत.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

काही युजर्स कायदाच्या अंमलबजावणीपूर्वीच ‘रिलायन्स जिओ’ची खरेदीची तयारी देखील पूर्ण झाली असल्याचा दावा करताहेत. सरकारकडून खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठीच कृषी कायदे संमत करण्यात आले असल्याचा दावा केला जातोय. 

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही ‘रिलायन्स जिओ’ अन्न-धान्याच्या खरेदीच्या व्यापारामध्ये उतरलेली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला इंटरनेटवर अशा प्रकारची कुठलीही बातमी सापडली नाही.

‘जिओ मार्ट’च्या वेबसाईटवर देखील ‘जिओ’चे गहू (jio wheat) विक्रीस उपलब्ध असल्याचे आढळून आले नाही. वेबसाइटच्या ‘आमच्याविषयी’ या सेक्शनमध्ये देखील ‘जिओ’ अन्न-धान्य खरेदीच्या व्यापारामध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले नाही.

त्यानंतर आम्ही सोशल मीडियावर व्हायरल फोटोज मध्ये दिसत असलेल्या गव्हाची विक्री कुठल्या कंपनीकडून केली जाते, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुजरातच्या सुरत मधील राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनीकडून या गव्हाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या कंपनीचा ‘रिलायन्स जिओ’शी काहीही संबंध नाही.

राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनीशी संबंधित कंपनीचे संस्थापक भरतभाई जजेरा यांनी ‘अल्ट न्यूज’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार होलसेल व्यापाऱ्यांकडे गहू पोहोचल्यानंतर व्यापारी ते लोकप्रिय नावाच्या बॅगमध्ये ते भरतात आणि त्यांची विक्री केली जाते. ज्यावेळी ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळी या नावाच्या बॅगमधून गव्हाची विक्री केली गेली. याचा अर्थ असा नाही की ‘बाहुबली’च्या दिग्दर्शकाकडून या गव्हाचे उत्पादन घेतले गेले होते. अशाच प्रकारे बाजीराव मस्तानीच्या प्रदर्शनानंतर ‘मस्तानी आटा’ देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोजसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोजचा ‘रिलायन्स जिओ’शी काहीही संबंध नाही. शिवाय गव्हाच्या किमतीचे आकडे देखील कुठल्याही तथ्याशिवाय देण्यात आलेले आहेत.  

हे ही वाचा- आंदोलक शेतकऱ्यांनी ‘जिओ’च्या टॉवरची जाळपोळ केलेली नाही, व्हायरल व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा