सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की रतन टाटांनी (Ratan Tata) दारू पिणाऱ्यांची खाद्यान्न सब्सिडी (Food subsidy) बंद करण्याची मागणी केली आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
“दारूची विक्री आधार कार्डच्या माध्यमातून केली जावी. दारू विकत घेणाऱ्यांसाठी सरकारची खाद्य सब्सिडी बंद करण्यात यावी. जी लोकं दारू विकत घेऊ शकतात, ती अन्न देखील विकत घेऊ शकतात. आपण ज्यावेळी त्यांना खाद्यान्नासाठी सब्सिडीच्या रूपात पैसे देतो, त्यातून ते दारू विकत घेतात”
भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट करत हे इंटरेस्टिंग असल्याचं म्हंटलय. अनिल चोप्राचं ट्विट १२०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.
पडताळणी:
रतन टाटांच्या नावाने शेअर केल्या जात असलेल्या मेसेजमधील अगदी सहज लक्षात येण्यासारखी चूक म्हणजे टाटांच्या नावाचं “Rathan Tata” असं लिहिण्यात आलेलं स्पेलिंग. शिवाय दावा अतिशय नाटकी स्वरूपाचा देखील वाटतोय. त्यामुळे शंका घ्यायला बराच वाव आहे.
दरम्यान, रतन टाटांनी अशा प्रकारची मागणी केली असती तर ती निश्चितच मोठी बातमी ठरली असती. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कुठेही अशा प्रकारची बातमी वाचायला मिळाली नाही. याउलट आम्हाला मनीकन्ट्रोलची बातमी मिळाली, ज्यामध्ये खुद्द रतन टाटांनीची सोशल मीडियावरील दावा फेक न्यूज असल्याचे म्हण्टल्याचे सांगण्यात आले आहे.
रतन टाटांनी आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून व्हायरल स्क्रिनशॉटमधील मेसेज शेअर करताना त्याला ‘फेक न्यूज’ घोषित केलं आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ते लिहितात,
“फेक न्यूज, मी असं म्हंटलेलं नाही, धन्यवाद”.
रतन टाटांच्या नावाने अशा प्रकारचे दावे शेअर केले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी उद्योजकांना उभारीचा संदेश देत २०२० हे फक्त जिवंत राहण्याचे वर्ष असल्याचं म्हंटल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी देखील टाटांनी स्वतः आपण असं काही म्हंटलेलं नसल्याचं सांगितलं होतं. ह्या संपूर्ण प्रकाराची माहिती आपण येथे क्लीक करून घेऊ शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की रतन टाटांनी दारू, खाद्यान्न सब्सिडी आणि आधार कार्डच्या संदर्भाने कुठलेही विधान केलेले नाही.
रतन टाटांनी (Ratan Tata) दारू पिणाऱ्यांची खाद्यान्न सब्सिडी (Food subsidy) बंद करण्याची मागणी केली असल्याच्या दाव्यांना कुठलाही आधार नाही. खुद्द टाटांनीच आपण असं काहीही म्हणालो नसल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा- अर्जुन देशपांडे यांच्या कंपनीचे ५०% शेअर्स टाटांनी घेतले नाहीत. एबीपी, भास्करच्या बातम्या चुकीच्या!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment