सध्या भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात वाद-विवादाच्या बातम्या समोर येताहेत. विराटच्या संघाचे कर्णधारपद सोडण्यावरून दोघांनीही जाहीररीत्या एकमेकांना खोटं ठरवलं आहे.
अशा स्थितीत विराट कोहलीच्या समर्थकांकडून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) ट्विटचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. दावा केला जातोय की विराट कोहली आणि बीसीसीआय (BCCI) दरम्यानच्या वादात राहुल गांधींनी विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे.
या ट्विटमध्ये लिहिले आहे, “प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत, कारण त्यांना कोणी प्रेम देत नाही. त्यांना माफ कर. संघाला सावर.”
पडताळणी:
व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये दिसणाऱ्या ट्विटमधील राहुल गांधींचे अकाउंट ब्लू टिकने व्हेरीफाईड देखील आहे आणि ट्विटर हॅंडल सुद्धा राहुल गांधींच्या अकाऊंटशी जुळणारं आहे. म्हणजेच हे ट्विट राहुल गांधी यांचंच आहे.
स्क्रिनशॉट व्यवस्थितरित्या बघितला असता एक गोष्ट मात्र अशी लक्षात येतेय की हे ट्विट 2 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही राहुल गांधींच्या अकाऊंटवर शोध घेतला असता आम्हाला हेच ट्विट बघायला मिळाले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हे ट्विट साधारणतः दिड महिन्यांपूर्वीचे असून विराट आणि बीसीसीआय हा वाद-विवाद गेल्या 8 दिवसांमध्ये समोर आला आहे. विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर हा वाद प्रामुख्याने चर्चेत आहे.
राहुल गांधींनी विराटला उद्देश्यून ट्विट का केले होते?
राहुल गांधींचे हे ट्विट टी-20 वर्ल्ड कप दरम्यानचे आहे. भारताने टी-20 वर्ल्ड कपमधील आपले सुरुवातीचे दोन्हीही सामने गमविल्यानंतर स्पर्धेतील भारताचे आव्हान जवळपास संपुष्ठात आले होते.
सुरुवातीच्या सामन्यांमधील भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर कर्णधार विराट कोहलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. काही ट्रोलर्सनी अगदी विराट कोहलीच्या छोट्या मुलीला देखील ट्रोलिंगचे लक्ष्य बनवले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी विराटला उद्देश्यून ट्विट केले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्याच्या विराट कोहली आणि बीसीसीआय दरम्यानच्या वादात विराट कोहलीला पाठिंबा दर्शविणारे ट्विट केलेले नाही.
व्हायरल स्क्रिनशॉट मधील ट्विट राहुल गांधी यांचेच असले, तरी ते वेगळ्या संदर्भाने करण्यात आले होते. सध्याच्या प्रकरणावर राहुल गांधींनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हायरल स्क्रिनशॉट सोबत केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.
हेही वाचा- कानपूर कसोटीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचे भगवे उपरणे घालून स्वागत करण्यात आले?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- विराट कोहली आणि बीसीसीआय दरम्यानच्या… […]