सोशल मीडियावर एका पत्राची कॉपी व्हायरल होतेय. दावा केला जातोय की बिहार निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी ५ नोव्हेंबर रोजी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून (modi letter to nadda) मुख्यमंत्री म्हणून गिरीराज सिंग यांचे नाव जाहीर केले होते.
नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात (modi letter to nadda) मोदींनी बिहार निवडणुकीत घेतलेल्या कष्टाबद्दल कौतुक आणि अभिनंदन करताना मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आलेल्या तीन नावांपैकी आपलं मत गिरीराज सिंग यांच्या बाजूने असल्याचं कळवलं होतं, असा दावा केला जातोय.
पडताळणी:
बिहार निवडणुकांचे निकाल काल लागले. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या बिहार निवडणुकीतील निकालांमध्ये भाजप-जनता दल (युनायटेड) या युतीला सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या १२२ जागांचा आकडा गाठण्यास यश मिळाले आहे.
बिहारच्या निवडणुकीत एनडीएला यश मिळाले असले तरी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाची मात्र मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत नितीश यांचा नैतिक पराभव झाला असल्याचा दावा करण्यात येतोय.
बिहारच्या निवडणूक प्रचारात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कुठल्याही पक्षाला कितीही जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं जाहीररीत्या सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कमी जागा मिळालेले नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार का, हे बघणे रंजक ठरणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रात मोदींनी मुख्यमंत्रीपदासाठी गिरीराज सिंग यांच्या नावास पसंती दर्शविली असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र यासंदर्भात कुठलंही बातमी आम्हाला बघण्यास मिळाली नाही. शिवाय बिहारमधील भाजपच्या इतरही कुठल्या महत्वाच्या नेत्याकडून असा काही दावा केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.
पत्रावरील तारखेनुसार ते ५ नोव्हेंबर रोजी लिहिलं गेलं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल्सना भेट देऊन ५ नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचे कुठले पत्र पोस्ट करण्यात आले आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे देखील आम्हाला असे कुठलेही पत्र मिळाले नाही. पत्र लक्ष्यपूर्वक वाचले असता त्यात शुद्धलेखनाच्या चुका असल्याचे देखील आमच्या निदर्शनास आले.
पंतप्रधानांकडून लिहिल्या जाणाऱ्या पत्रांचे प्रारूप बघण्यासाठी गुगल सर्च केलं असता आम्हाला पंतप्रधानांनी कर्नाटकातील एका व्यक्तीला वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाबद्दल धन्यवाद देण्यासाठी लिहिलेले पत्र मिळाले.
आम्ही व्हायरल पत्र आणि या पत्राची तुलना केली असता आमच्या लक्षात आले की दोन्ही पत्रांमध्ये तारीख लिहिण्याचा कॉलम आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी यांमध्ये फरक असून हा फरक सहज लक्षात येण्याजोगा आहे. पत्रावरील लोगोमधील फरक देखील आपल्या लक्षात येईल. सहाजिकच व्हायरल खरे नसून फोटोशॉप करण्यात आलेले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल पत्र फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक निकालांपूर्वीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी गिरीराज सिंग यांच्या नावास पसंती दर्शविली नव्हती. निवडणुकीच्या निकालानंतर देखील सध्यापर्यंत तरी कुणीही मुख्यमंत्रीपदासाठी गिरीराज सिंग यांचे नाव सुचवलेले नाही.
हे ही वाचा- अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पवारांची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात अर्नबला अटक?
Be First to Comment