Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींनी नथुराम गोडसेच्या फोटोस हार घातला?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) दिसताहेत. सोबतच राजनाथ सिंह यांचं ‘कुणी नथुराम गोडसेची पूजा कशी काय करू शकतं?’ असा सवाल करणारं विधान आणि नथुराम गोडसेची (Nathuram Godse) पूजा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आदेशाची बातमी देखील आहे.

Advertisement

या फोटोच्या खालोखाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका फोटोसमोर नतमस्तक होऊन त्या फोटोला हार घालताना दिसताहेत. दावा केला जातोय की एकीकडे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच गोडसेची पूजा करत असताना राजनाथ सिंहांकडून अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही राजनाथ सिंह यांनी अशा प्रकारचं विधान नेमकं कधी आणि कुठे केलं होतं, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ४ मार्च २०१६ रोजीच्या अनेक बातम्या मिळाल्या, ज्यांमध्ये त्यावेळी गृहमंत्री पदावर विराजमान असलेल्या राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नथूराम गोडसेची पूजा करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

राजनाथ सिंह म्हणाले होते की नथुराम गोडसेची पूजा कशी केली जाऊ शकते? गांधी हत्येचा उत्सव साजरा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारांनी ही कारवाई केली पाहिजे. म्हणजेच व्हायरल फोटोतील राजनाथ सिंह यांचं विधान जुनं असलं तरी ते खरं आहे, हे स्पष्ट झालं.

त्यानंतर आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला ‘मुस्लिम मिरर’ या वेबसाईटवर प्रकाशित बातमीमध्ये सदर फोटो सापडला. या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळचा हा फोटो आहे.

Source: muslimmirror

यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) अभिवादन केल्यानंतर लगेचच नथुराम गोडसेच्या पुतळ्याला हार घातला असल्याचे दावे व्हायरल झाले होते. त्याची ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेली पडताळणी आपण येथे वाचू शकता.  

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केला जाणारा पंतप्रधान मोदींनी नथुराम गोडसेच्या फोटोस हार घातल्याचा दावा चुकीचा आहे. मोदी ज्या फोटोला हार घालताहेत तो फोटो नथुराम गोडसेचा नसून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे.

हेही वाचा- ‘पुलवामा हल्ला भाजपची नियोजनबद्ध चाल होती, विंग कमांडर अभिनंदन यांचा खुलासा? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा