पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुठल्याशा कार्यक्रमात प्रवेश करताना दिसताहेत. तिथे त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातंय. दावा केला जातोय की नरेंद्र मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
“मोदी जी को 153देशो का अध्यक्ष चुना गया मुझे गर्व है मेरे देश के शेर पर विदेशो मे कोई भारत को जानता नही था आज मोदी जी वहा के मुख्या है” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
हाच व्हिडीओ २०१८ साली देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पडताळणी:
- आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.
- व्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन जोस येथील सॅप सेंटरमध्ये भारतीय अमेरिकन समुदायाला संबोधित केले होते.
- या कार्यक्रमात मोदींनी साधारणतः तासभर भाषण केले. मात्र त्या ठिकाणी कुठेही पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची काही घोषणा करण्यात आली नव्हती.
- ‘द हिंदू’च्या वेबसाईटवर या कार्यक्रमाचे क्षणाक्षणांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. त्यानुसार मोदींनी जवळपास तासभराचे भाषण संपवल्यानंतर ते पुन्हा स्टेजवर आले आणि त्यांनी घोषणा केली की २ डिसेंबर २०१५ पासून एअर इंडियाचे दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को हे विमान आठवड्यातून तीन वेळा चालवले जाईल. या घोषणे व्यतिरिक्त दुसरी कुठलीही महत्वपूर्ण घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली नव्हती.
- गमतीची गोष्ट अशी की अशा प्रकारचे १५३ देशांचे अध्यक्षपद वैगेरे असले कुठलेही पदच अस्तित्वात नाही. शिवाय अशी एक व्यक्ती १५३ देशांची प्रमुख असणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य देखील नाही.
- सध्या मोदींना १५३ देशांचे अध्यक्ष बनविण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र यापूर्वी देखील इंटरनेटवर मोदींना ५३ देशांचे अध्यक्ष बनविण्यात आल्याचे दावे देखील केले गेले होते. अर्थात या दाव्यांना देखील कुठलाही आधार नव्हता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. २०१५ सालच्या कॅलिफोर्नियातील कार्यक्रमाचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
हेही वाचा: नरेंद्र मोदींनी स्वतः ‘छोट्या चोरापासून लुटेरा’ बनल्याची कबुली दिल्याचा व्हायरल व्हिडीओ एडीटेड!
[…] हेही वाचा- पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्य… […]