पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) सूचनेवरून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiraditya Scindia) यांनी ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या भारतीय नागरिकांना भारतभरात विमानप्रवास करण्यासाठी केवळ ५०% म्हणजेच अर्धे शुल्क मोजावे लागणार असे आदेश दिले असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
व्हायरल मेसेज:
सभी वरिष्ठ नागरिकों को बधाई 🙏
बढ़िया खबर
केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया जी द्वारा पीएम मोदी के सपने को साकार करने की एक और पहल पीएम मोदी द्वारा आगे लाए गए हवाई किराए को पास कर दिया है।
भारतीय राष्ट्रीयता के सभी वरिष्ठ नागरिक और स्थायी रूप से भारत में रहने वाले, 60 वर्ष से अधिक आयु के लोगों को भारत के भीतर यात्रा के लिए एयर इंडिया फ्लाइट टिकट आधी कीमत पर मिलेगा ।
कृपया अपने परिवार और दोस्तों के वरिष्ठ नागरिकों को सूचित करेंकृपया सीनियर सीटिजन तक यह खबर पहुंचाकर उन्हें लाभ पहुंचाने के लिए सहयोग करें।।
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुधीर सोनटक्के यांनी व्हॉट्सऍपवर ‘forwarded many times’ या टॅगखाली मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असणारा हा मेसेज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेजच्या अनुषंगाने गुगल सर्च केले असता केंद्र सरकारने, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची कुठलीही घोषणा केल्याची बातमी बघावयास मिळाली नाही.
परंतु ‘एअर इंडिया’ने वैयक्तिकरित्या आपल्या भारतीय प्रवाशांसाठी अशा प्रकारच्या सवलतीची घोषणा केल्याचे सांगणाऱ्या विविध बातम्या आम्हाला मिळाल्या.
‘एअर इंडिया’च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली असता या सवलतीविषयी सविस्तर माहिती मिळाली. ही ५०% सूट केवळ ६० वर्षे वया पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे. केवळ इकॉनॉमी क्लासने भारतामध्येच फिरण्यासाठी ही सवलत लागू आहे. तसेच संपूर्ण तिकिटावर नव्हे तर केवळ ‘बेस फेअर‘वर ही ५०% सूट असणार आहे.
‘एअर इंडिया’ आता सरकारी नव्हे, खाजगी कंपनी आहे.
केंद्र सरकारने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी १८००० कोटी रुपयांमध्ये टाटा सन्सला ‘एअर इंडिया’ विकली. त्यामुळे तेथून पुढे ही सरकारी नव्हे तर खाजगी मालमत्ता आहे. तिने दिलेल्या सवलतींवर मोदी सरकारचा काहीएक संबंध नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की पंतप्रधान मोदींच्या सुचनेनुसार ६० वर्षे वयाहून अधिकच्या भारतीय ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलतीत विमान प्रवास उपलब्ध करून दिल्याचे दावे फेक आहेत. ही योजना केवळ ‘एअर इंडिया’ कंपनीची असून ही कंपनी खाजगी आहे.
हेही वाचा: भाजप नेत्यांनी पोस्ट केला ‘नोएडा’ विमानतळाचा म्हणून ‘बीजिंग’ विमानतळाचा फोटो, चीनने फटकारले!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]