मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेत प्रत्येक बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा देणारा अध्यादेश काढला असून त्यावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी सही करून शिक्कामोर्तब केले. असे दावे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
- भारतीय जनता पार्टी घाटंजी, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आम्ही हिंदूत्ववादी, भाजपा मित्र महाराष्ट्र २८८ विधानसभा, मा.गोपीचंद पडळकर साहेब युवा मंच महाराष्ट्र राज्य अशा फेसबुक ग्रुप्सवरून सदर दावे व्हायरल होत आहेत.
पडताळणी:
सरसकट सर्व बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा आदेश म्हणजे अतिशय मोठ्या राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बातमीचा विषय आहे. तरी एकाही वृत्तपत्र किंवा वाहिनीवर अशा प्रकारची बातमी आढळली नसल्याने ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी सुरु केली.
- गुगलवर ऍडव्हान्स्ड की-वर्ड सर्च करून पहिल्यानंतरही अशा प्रकारची बातमी किंवा संबंधित माहिती मिळाली नाही. २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या मिळाल्या.
- यानुसार, १२ वर्षे वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा सुनावण्यास मार्ग मोकळा करून देणारा अध्यादेश काढण्यात आला होता, त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याचं सांगण्यात आलं आहे.
- या अध्यादेशानुसार (Criminal Law (Amendment) Ordinance 2018) महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची कमीतकमी कारावासाची शिक्षा ७ वर्षांहून १० वर्षे करण्यात आली आहे.
- १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास कठोर कारावासाची किमान शिक्षा १० वर्षांहून २० वर्षे केली गेली आहे.
- १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास किमान २० वर्ष कारावास ते कमाल जन्मठेप किंवा फाशी यांसारख्या शिक्षांच्या तरतुदी आहेत.
- सर्वच बलात्कारांच्या गुन्ह्यांची न्यायालयीन सुनावणी २ महिन्यात व्हावी, ६ महिन्याच्या आत त्यावरील अपिलांवर सुनावणी व्हावी आणि १६ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटकपूर्व जामीन देखील मिळू नये अशा तरतुदी त्या अध्यादेशात होत्या.
वस्तुस्थिती:
राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (NCRB) अहवालानुसार २०१९ साली रोजच्या ८७ बलात्कारांच्या घटनांची देशात नोंद झालीय. हे वास्तव भीषण असले तरीही मोदी सरकारने सरसकट सर्व बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावणारा अध्यादेश जारी केला नाही. व्हायरल दावे फेक आहेत.
हे ही वाचा: भाजप नेत्याची आपल्याच मुलीवर बलात्काराची ११ वर्षांपूर्वीची बातमी ताजी म्हणून व्हायरल!
[…] […]