राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या नावाने एक ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी 2024 पर्यंत भाजप सर्व राज्यांतील सत्ता गमावणार असल्याचा दावा केल्याचे सांगितले जातेय. देशातील सर्व राज्यांमधील मानहानीकारक पराभवानंतर भाजप केवळ गुजरातपुरता मर्यादित पक्ष बनेल, शिवाय गुजरातमधील कामगिरी देखील खराब असेल, असे देखील प्रशांत किशोर यांनी म्हंटल्याचे सांगितले जातेय.
फेसबुकवर अनेक वेगवेगळ्या पेजवरून हे ग्राफिक शेअर करण्यात आले आहे.
पडताळणी:
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी अशा प्रकारचे विधान केले असते, तर साहजिकच ती एक मोठी बातमी ठरली असती. मात्र आम्हाला माध्यमांमध्ये कुठेही यासंदर्भातील बातमी बघायला मिळाली नाही.
व्हायरल ग्राफिकमधील प्रशांत किशोर यांचा फोटो व्यवस्थित बघितला तर हा फोटो इंडिअन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील असल्याचे लक्षात येतेय. त्यामुळे आम्ही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता सदर फोटो इंडिअन एक्स्प्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या आयडिया एक्स्चेंज या कार्यक्रमातील असल्याचे समजले.
इंडिअन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर 29 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळतोय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एक्स्प्रेसने प्रशांत किशोर यांच्याशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी इंडिअन एक्स्प्रेसच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिले होती.
बंगालची निवडणूक ही थेट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील लढत आहे. बंगालच्या निवडणुकीत जर तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला, तर भारताची वाटचाल एक राष्ट्र, एका पक्षाकडे होईल आणि भाजप लोकांचे जगणे नियंत्रित करेल, असे प्रशांत किशोर यांनी म्हंटले होते. या संपूर्ण मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी कुठेही भाजप 2024 पर्यंत सर्व राज्यांतील सत्ता गमावणार असल्याचा दावा केलेला नाही.
प्रशांत किशोर यांनी याच कार्यक्रमात ‘बंगालमध्ये भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही आणि तसे झाल्यास पुन्हा कधीच राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाही’ या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार देखील केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप 2024 पर्यंत सर्व राज्यांतील सत्ता गमावणार असल्याचा दावा केलेला नाही. व्हायरल ग्राफिकसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत.
हेही वाचा- कर्नाटकातील शिमोगा येथे भारतीय ‘तिरंगा’ हटवून ‘भगवा ध्वज’ फडकवण्यात आल्याचे दावे चुकीचे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment