Press "Enter" to skip to content

राम मंदिर गर्भगृहात दोन हजार फूट खोल ‘टाईम कॅप्सूल’ पुरण्यात आलीये?

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतोय. मेसेजमध्ये दावा केला जातोय की ५ ऑगस्ट २०२० रोजी आयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमिनीत दोन हजार फूट खोल टाईम कॅप्सूल (time capsule ayodhya) देखील पुरली गेली आहे.

Advertisement

टाईम कॅप्सूल पुरण्याची जागा थेट गर्भगृहाच्या खाली असून या टाईम कॅप्सूल मध्ये राम मंदिर आंदोलनाचा इतिहास आणि राम मंदिराची ऐतिहासिक माहिती जतन करण्यात आली आहे.

टाईम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय? आतापर्यंत देशात कधी, कुठे आणि किती टाईम कॅप्सूल ठेवण्यात आल्यात यासंबंधीची माहिती देखील या विस्तृत पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

सदर व्हायरल पोस्ट ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक लक्ष्मीकांत सोरटे यांनी निदर्शनास आणून दिली.

असेच दावे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ग्राफिक्सच्या माध्यमातून फिरत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेजमधील दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुगल सर्च केलं, त्यावेळी आम्हाला मुख्य प्रवाहातील अनेक माध्यम संस्थांच्या बातम्या मिळाल्या. बहुतेक बातम्यात राम मंदिराच्या भूमिपूजनापूर्वी २००० फूट खाली टाईम कॅप्सूल (time capsule ayodhya) बसवण्यात येणार असल्याचं, सांगण्यात आलं होतं.

राम मंदिराची देखभाल करणाऱ्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्र्वर चौपाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या बातम्या देण्यात आल्या होत्या. कामेश्र्वर चौपाल यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिलेली असल्याने मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी ही बातमी चालवली.  

बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ जुलै रोजी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ ट्रस्टकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं. ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ट्विटरच्या माध्यमातून टाईम कॅप्सूल (time capsule ayodhya) संदर्भातील बातम्या चुकीच्या आणि कल्पनेच्या भराऱ्या असल्याचं सांगितलं. शिवाय त्यानंतर राम मंदिराच्या संदर्भात फक्त ट्रस्टकडून देण्यात आलेली माहितीच अधिकृत मानण्यात यावी असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 

टाईम कॅप्सुलम्हणजे काय?

‘टाईम कॅप्सुल’ हे एक असे संदुक आहे असं समजा की ज्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू, माहिती, कागदपत्रे ठेवली जातात आणि पुरले जाते. भविष्यात जर काही घटना घडली, सर्व जमीनदोस्त झालं तर पुढच्या पिढीला उत्खननात हे सापडेल आणि त्या त्या काळची महत्वाची सहज मिळणे शक्य होईल.

पुरातत्व वैज्ञानिक के.के. मोहोम्मद यांनी ‘बीबीसी’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ‘टाईम कॅप्सुल’च्या आकार, रंग यांविषयी काही स्पष्ट नियमावली नाहीये. ती कुठल्याही आकारात असू शकते. जी व्यक्ती किंवा संस्था टाईम कॅप्सूल बनवत असते, तीच तिच्या आकारासंबंधीचा निर्णय घेते.

भारतातील आजवरचे टाईम कॅप्सूल:

१. लाल किल्ला, दिल्ली:

देशाच्या स्वातंत्र्यानंतर २५ वर्षाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या वाटचालीतील गौरवशाली क्षणांची माहिती ‘टाईम कॅप्सूल’च्या स्वरूपात दिल्लीच्या लाल किल्ल्यात जतन करून ठेवली होती. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी गाडलेले हे टाईम कॅप्सूल मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या सरकारने खोदून काढले होते. मात्र त्यात कुठली माहिती होती, हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले नव्हते.

२. आयआयटी, कानपूर:

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ६ मार्च २०१० रोजी आयआयटी कानपूरमध्ये टाईम कॅप्सूल बसवलं होतं. या टाईम कॅप्सूलमध्ये आयआयटी कानपुरचा नकाशा, सिल्वर ज्युबिली आणि गोल्डन ज्युबिली लोगो यांसारख्या माहितीचा समावेश होता, असं देखील बीबीसीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

३. गांधी मंदिर, गुजरात:

नरेन्द्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना महात्मा मंदिरात टाईम कॅप्सूल बसवलं होतं. यात गुजरात राज्य निर्मिती पासूनच्या फाईल्स जतन केल्या आहेत.

४. द अलेक्झांडरा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूट, मुंबई:

२०१४ साली मुंबईच्या ‘द अलेक्झांडरा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूट’ मध्ये सुद्धा ‘टाईम कॅप्सूल’ बसवण्यात आलं होतं. यामध्ये भविष्यातील विद्यार्थांसाठी पत्र, आतापर्यंतचे विद्यार्थ्यांचे गणवेश, बॅज यांसारख्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत.

५. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर:

२०१९ साली इंडियन सायन्स कॉंग्रेसद्वारे १०० टेकनोलॉजीकल वस्तू, जसे की लॅपटॉप, स्मार्टफोन, ड्रोन यांसारखी उपकरणे ठेवली आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर राम मंदिरात टाईम कॅप्सूल (time capsule ayodhya) बसविण्यात आल्यासंबंधीचा जो दावा करण्यात येतोय, तो फेक असून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून तो नाकारण्यात आलाय.

व्हायरल पोस्टमधील ‘टाईम कॅप्सूल’ संदर्भातील इतर माहितीमध्ये मात्र बऱ्यापैकी तथ्य असल्याचे देखील पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा- श्रीनगरमधील लाल चौकात फडकला तिरंगा म्हणत भाजप नेते शेअर करताहेत एडिटेड फोटो!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा