Press "Enter" to skip to content

ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुरु केली डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशिप?

सोशल मीडियावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोसोबत दावा करण्यात आलाय की ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशिप (Manmohan Singh Scholarship) सुरु केलीय.

Advertisement

काय आहे मेसेज?

व्हायरल मेसेजमध्ये म्हंटलंय की ८०० वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने स्कॉलरशिप सुरु केली आहे. जगाने  एका उच्चशिक्षित व्यक्तीचा योग्य तो सन्मान केला आहे. सर्व भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण आहे.

कुठल्याही भारतीय माध्यमाने या घटनेला प्रसिद्धी दिलेली नाही. त्यामुळे सर्व भारतीयांपर्यंत ही बातमी पोहचवा, असे आवाहन देखील मेसेजमध्ये करण्यात आले आहे.

पडताळणी:

  • आम्ही ज्यावेळी सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याची पडताळणी सुरु केली त्यावेळी लक्षात आले की ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने स्कॉलरशिप (Manmohan Singh Scholarship) सुरु केल्याचा दावा सोशल मीडियावर साधारणतः २०१७ सालापासून व्हायरल आहे.
  • काँग्रेसच्या नेत्या आणि ‘एशियन एज’ ‘राजस्थान पत्रिका’ यांसारख्या वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन करणाऱ्या अर्चना दालमिया (Archana Dalmia) यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हाच दावा केला होता.

अर्काइव्ह

  • पडताळणी दरम्यान आम्हाला भारतीय माध्यमांमध्ये तर नाहीच पण कुठल्याही आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये देखील यासंदर्भातील कुठलीही बातमी बघायला मिळाली नाही.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील विद्यापीठाकडून मनमोहन सिंग यांच्या नावे कुठलीही स्कॉलरशिप दिली जात असल्याचा उल्लेख बघायला मिळाला नाही.
  • पडताळणी दरम्यान आम्हाला ‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमी वाचायला मिळाली. या बातमीमध्ये जगप्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठाकडून मनमोहन सिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
  • बातमीनुसार केम्ब्रिज विद्यापीठाने २००७ सालापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाने स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे. प्रतिवर्षी ३ विद्यार्थ्यांना ३५ हजार पौंड शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जातात.
  • केम्ब्रिज विद्यापीठाची मनमोहनसिंग स्कॉलरशिप केवळ अशा भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे, जे सेंट जोन्स कॉलेजमधून विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पीएचडी किंवा एमफिल करू इच्छितात. नवी दिल्ली स्थित ब्रिटिश कौन्सिलद्वारे स्कॉलरशिप कार्यक्रमाचे काम संचालित केले जाते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे स्कॉलरशिप सुरु केली असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून अशा प्रकारची कुठलीही स्कॉलरशिप सुरु केलेली नाही.

केम्ब्रिज विद्यापीठाने मात्र २००७ सालापासून विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ स्कॉलरशिप सुरु केलेली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या सेंट जोन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते.

हेही वाचा- अमेरिकेने डॉ. मनमोहन सिंह यांचा जगातल्या ५० प्रामाणिक व्यक्तींच्या यादीत समावेश केलाय?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा