नोबेल पारितोषिक विजेते डॉ. तासुकू होन्जो (tasuku honjo) यांनी कोरोना व्हायरस मानवनिर्मितच असून चीनच्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असल्याचा दावा केलाय. शिवाय तेथील तंत्रज्ञांचे फोन गेल्या ३ महिन्यापासून लागत नाहीत. म्हणजेच त्यांना मारून टाकण्यात आले आहे. असा दावा करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रुपेश पोळ यांनी व्हॉट्सऍपवर फिरणारी पोस्ट निदर्शनास आणून दिली आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल दाव्याची पडताळणी करताना आमच्या समोर आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे-
१. डॉ. होन्जो आणि नोबेल पारितोषिक
व्हायरल दावा ज्यांच्या हवाल्याने केला जातोय त्या डॉ. तासुकू होन्जो (tasuku honjo) यांच्याविषयी जाणून घेत असताना आम्हाला असे समजले की ‘नकारात्मक प्रतिकारशक्तीला रोखून कर्करोगावर ईलाज करण्याच्या पद्धतीचा शोध लावल्यामुळे’ त्यांना २०१८ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. ते जपानच्या क्योटो विद्यापीठात कार्यरत आहेत.
२. डॉ. होन्जो यांचे व्हायरल दाव्यावर स्पष्टीकरण
क्योटो विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या डॉ. होन्जो यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवरूनच सदर दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व मानवजातीचा शत्रू बनलेल्या या महामारीला आपणास एकत्र येऊन रोखायचे आहे, त्यासाठी मी माझ्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करायला तयार आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
३. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने व्हायरल दाव्याला दिली हवा
फेसबुकवर व्हायरल होत असणाऱ्या काही पोस्ट्सवर ‘लेखक पूर्व राज्यसभा सांसद और ‘हिन्दुस्थान समाचार समूह के अध्यक्ष हैं’ असे लिहिल्याचे आढळले. त्यावर ‘आर के सिन्हा’ या नावाचा उल्लेखसुद्धा होता. हाच धागा पकडून पडताळणी केली असता असे लक्षात आले की माजी राज्यसभा सदस्य असलेले भाजप नेते रवींद्र किशोर सिन्हा यांनी सदर व्हायरल दाव्यांना खरे मानून विविध ठिकाणी लेख प्रकाशित केले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉ. तासुकू होन्जो यांच्या नावाने फिरत असलेली व्हायरल पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले. तासुकू होन्जो यांनी कोरोना व्हायरस मानवनिर्मितच असून चीनच्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असल्याचा दावा केलेला नाही. खुद्द तासुकू होन्जो यांनीच आपल्या नावे फिरत असलेले दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा: मुस्लीम नावांनी बुक असलेले बेड रिकामेच आढळल्याचे ‘बेड जिहाद’चे दावे फेक!
[…] हेही वाचा: नोबेल विजेते डॉ. होन्जो यांनी कोरोना व… […]