सोशल मीडियावर एक ग्राफिक व्हायरल होतंय. यामध्ये दावा केला जातोय की भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पराभवाची भविष्यवाणी केली आहे.
मोदींवर टीका करतानाच जोशींनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या साधेपणाचे कौतुक केल्याचं देखील सांगितलं जातंय.
‘अगर मोदी इसी तरह घमंड में रहे तो 2024 में बुरी तरह हारेंगे और देश की जनता राहुल गांधी के सादगी को जीतायेगी’ असं वक्तव्य मुरली मनोहर जोशींच्या नावाने व्हायरल होतंय.
काही युजर्सकडून हाच दावा राहुल गांधींच्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव टाकून देखील शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल ग्राफिकमध्ये कुठलाही स्रोत देण्यात आलेला नाही. मुरली मनोहर जोशींनी अशा प्रकारचं विधान नेमकं कुठे आणि कधी केलं याचा कसलाही उल्लेख बघायला मिळत नाही.
मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जर खरंच अशा प्रकारचं काही विधान केलं असतं, तर ती राष्ट्रीय स्तरावर मोठी बातमी ठरली असती. मात्र मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही माध्यमामध्ये आम्हाला याविषयीची बातमी बघायला मिळाली नाही.
आम्ही मुरली मनोहर जोशी यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारचं काही वक्तव्य केलं आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, जोशी यांचं अधिकृत ट्विटर किंवा फेसबुक अकाउंट आम्हाला मिळू शकलं नाही.
दरम्यान, जोशी यांचे स्वीय सहाय्यक राजीव बेलवाल यांनी मात्र ‘आज तक’शी बोलताना सोशल मीडियावरील व्हायरल वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलंय. मुरली मनोहर जोशी यांनी अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ते घराच्या बाहेर देखील पडलेले नाहीत, असंही बेलवाल यांनी स्पष्ट केलंय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी २०२४ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पराभव होणार असल्याची भविष्यवाणी केलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये जोशी यांनी कुठलेही राजकीय भाष्य केलेले नाही. सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत.
हे ही वाचा- पक्षातीलच आमदाराला बुटाने मारणारे ‘आप’ नेते संजय सिंह नाहीत, ते तर भाजप नेते!
Be First to Comment