‘मॉर्गन स्टॅनली’ या अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक आणि फायनान्शियल सर्विस पुरवणाऱ्या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फार महत्वाचे मुद्दे (morgan stanley modi) मांडले आहेत. त्यात त्यांनी मोदी भारतासाठी सर्वोत्तम पंतप्रधान कसे आहेत हे सांगितले आहे. अशा आशयाच्या पोस्ट्स, मेसेजेस सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
विजय गोयल या ट्विटर युजरने कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटवर रिप्लाय म्हणून सदर दावे असणारा मेसेज पोस्ट केला आहे.
व्हायरल पोस्टचा मराठी अनुवाद:
मॉर्गन स्टॅन्ली रिसर्चने ही माहिती दिली आहे.
१. इतर कोणत्याही पंतप्रधानांच्या तुलनेत नरेंद्र मोदींनी शेवटच्या तीन वर्षांत जागतिक बँकेकडून अवघे १ डॉलर इतकेही कर्ज घेतले नाही.
२. येत्या दहा वर्षांत भारताचा जीडीपी ६ ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाण्याचा अंदाज.
३. फोर्ब्स मासिकानुसार “मोदींच्या धोरणांनी भारताची अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढेल”
४.१७७ देशांच्या आर्थिक वाढीचे नुकतेच जाहीर केलेले म्हणणे:
अ. 137 सूचीबद्ध देशांपैकी भारत ४० वरून ३१ व्या स्थानावर आला.
ब. स्वातंत्र्यानंतर भारत कधीही अशा स्थानावर पोहोचलेला नाही.
फोर्ब्स मासिकाने या सर्वाचे जोरदार कौतुक केले असून असेही उद्धृत केले आहे की केवळ मोदींच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. परंतु कोणत्याही मासिकाने, वृत्तपत्राने हे प्रसिद्ध केलं नाही.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन यांनी सदर व्हायरल पोस्ट्सविषयी माहिती देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने एकेक मुद्याची पडताळणी करून पाहिली, काय हाती आलं वाचा:
१. मोदींच्या काळात भारताने जागतिक बँकेकडून कर्ज घेतले नाही?
आम्ही राज्यसभेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. १५ सप्टेंबर २०२० रोजीच्या माहितीनुसार वित्त मंत्रालयाने उत्तर दिले आहे की कोव्हीड१९वर मात करण्यासाठी भारताने जागतिक बँकेचे तब्बल अडीच बिलियन डॉलर्स एवढे कर्ज घेतले आहे. या आधीही अनेकदा कर्ज घेतले आहे. तारखेनुसार कर्जाच्या रकमेची माहिती ‘येथे‘ वाचू शकता.
२. पुढील दहा वर्षात भारताचा जीडीपी ६ ट्रिलीयन एवढा असेल?
‘मॉर्गन स्टॅन्ली’ने पुढील १० वर्षात भारताचा जीडीपी ६ ट्रिलीयन होईल असा अंदाज वर्तवला होता. परंतु तो अंदाज आता नव्हे तर २०१७ साली वर्तवला होता. म्हणजेच २०२६-२७ मध्ये हे चित्र असेल असा त्यांचा अंदाज होता. परंतु कोरोना काळात भारताच्या अर्थव्यवस्थेची काय अवस्था झाली हे आपण पाहिलेय.
३. “मोदींच्या धोरणांनी भारताची अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढेल” असे फोर्ब्स मासिकाचे म्हणणे आहे?
अशा अर्थाची कुठलीही माहिती आम्हाला फोर्ब्स मासिकाच्या संदर्भात आढळली नाही. उलट ‘India Has Worst Economy In 42 Years. Is Prime Minister Modi Watching?’ आणि ‘Don’t Underestimate India’s Cunning Narendra Modi’ असे मथळे असलेले टीकात्मक दोन लेख आमच्या हाती लागले.
४. 137 सूचीबद्ध देशांपैकी भारत ४० वरून ३१ व्या स्थानावर आला आहे?
अशा पद्धतीची ‘आर्थिक वाढीच्या’ संदर्भातील देशांची यादी कुठेही प्रसिद्ध होत नाही. आर्थिक परिस्थितीनुसार जर देशांची यादी पाहिली तर भारत ४० व्या स्थानावर होता हे खरे आहे पण तो २०१७ साली होता. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या रिपोर्टमध्ये जे भारताचे स्थान आहे त्यापेक्षा त्या आधीच्या वर्षी भारत जास्त चांगल्या स्थानावर होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की ‘मॉर्गन स्टॅनली’च्या रिसर्च टीमने नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा रिपोर्ट (morgan stanley modi) बनवला असल्याचे सांगत ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.
‘मॉर्गन स्टॅनली’ने देखील ‘द क्विंट’शी बोलताना अशा प्रकारच्या कुठल्याही रिपोर्टचे खंडन केले आहे.
हे ही वाचा: ‘पीआयबी’चं फॅक्ट चेक, मंत्रालयाकडून ‘फेक’ घोषित!
Be First to Comment