अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केलेले जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष असणार आहेत. बायडन यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे प्रमुख पाहुणे (manmohan singh chief guest) म्हणून निमंत्रित असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
अनेक युजर्स डॉ. मनमोहन सिंह यांच्या वेगवेगळ्या फोटोंसह पोस्ट करताहेत. सोबत दावा केला जातोय की,
“ज्यांना या भाजपाईंनी मौनी बाबा म्हणून चिडवलं होतं ना – त्या मनमोहन सिंग यांना बायडन यांच्या शपथविधी समारोहाचे मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण आहे!”
फेसबुकसह ट्विटर आणि व्हॉटसअपवर देखील हाच दावा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी :
डॉ. मनमोहन सिंह यांना खरंच अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित (manmohan singh chief guest) करण्यात आले आहे का, हे पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही महत्वाच्या न्यूज चॅनेल अथवा न्यूज पेपरमध्ये आम्हाला यासंबंधीची बातमी आढळली नाही.
आम्ही व्हाईट हाऊसच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट दिली. मात्र तिथे देखील शपथविधी बायडन यांच्या नियोजित शपथविधी समारंभाविषयीची किंवा प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांना आमंत्रित करण्यात आल्याविषयीची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. याच गोष्टीची पुनरावृत्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वेबसाईट आणि अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल्स संदर्भात देखील झाली.
शपथविधी सोहळ्याविषयी सध्या आपल्याकडे काय माहिती आहे?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळण्यासाठीचा आणि शपथविधी पार पाडण्यासाठीचा बायडन यांचा पुढचा कसा असणार याविषयीची सविस्तर माहिती देणारा रिपोर्ट बीबीसी हिंदीच्या वेबसाईटवर वाचण्यात आला. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की अमेरिकन संविधानानुसार नवीन राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ अधिकृतपणे 20 जानेवारी रोजी दुपारी सुरू होईल.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका विशेष ‘इनॉग्रेशन सिरेमनी’चे आयोजन केले जाते. याच समारंभात अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नवीन राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. म्हणजेच जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी देखील 20 जानेवारी 2021 रोजी पार पडेल.
राष्ट्रपतीपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या अपवादात्मक परिस्थितीतच उपाध्यक्ष पदावरील व्यक्तीला त्वरित अध्यक्षपदाची शपथ दिली जाते. नाहीतर सामान्यतः शपथविधी समारंभ 20 जानेवारी रोजीच पार पडतो.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालानंतच्या दिवसापासून ते ‘इनॉग्रेशन सिरेमनी’ पर्यंतच्या काळाला ‘प्रेजिडेन्शियल ट्रांज़िशन’ असं म्हंटलं जातं. या काळात एक ट्रांज़िशन टीम सत्तेच्या हस्तांतरणासाठी कार्यरत असते. बायडन-हॅरिस यांच्यासाठीही ट्रांज़िशन टीम देखील सक्रिय झाली आहे.
‘इनॉग्रेशन सिरेमनी’साठी कोण उपस्थित राहण्याची शक्यता आहे?
‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार ‘इनॉग्रेशन सिरेमनी’साठी विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय, नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि कुटुंबीय , अमेरिकन सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश आणि सहाय्यक न्यायाधीश, माजी राष्ट्राध्यक्ष, कॅबिनेट सदस्य इ. उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या नियोजित शपथविधी समारंभाविषयी अथवा त्यासाठी बोलावल्या जाणाऱ्या प्रमुख पाहुण्यांविषयी कुठलीही घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आलेली नाही. इतरही कुठल्या अधिकृत ठिकाणी डॉ. मनमोहन सिंह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचं आढळून आलं नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की डाॅ. मनमोहन सिंग यांना अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचा दाव्याला कुठलाही आधार नाही. अमेरिकेकडून अद्यापपर्यंत तरी शपथविधी समारंभाविषयीची कुठलीही महत्वाची घोषणा करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा- डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधातील भाजप नेते व समर्थकांच्या फेक दाव्यांची झाडाझडती!
[…] हे ही वाचा- डाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्य… […]