Press "Enter" to skip to content

‘महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी यू-टर्न मारला का?

महाराष्ट्रात लष्कराची गरज आहे किंवा नाही या संदर्भात दोन वेगवेगळे दावे करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दोन बातम्या शेजारी शेजारी लाऊन बनवलेल्या इमेजेस सध्या व्हायरल होत आहेत.

Advertisement

स्वतःची ओळख सांगताना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी’ संबंध असल्याचे सांगणाऱ्या ‘केशव ए’ या फेसबुक युजरने यासंदर्भात पोस्ट टाकली आहे.

पहिल्या चौकटीत असणारी बातमी आहे ‘शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही: उद्धव ठाकरे’ आणि दुसऱ्या चौकटीतील बातमी आहे ‘माझी सुरुवातीपासूनच लष्कराकडून मार्गदर्शन घेण्याची तयारी होती-उद्धव ठाकरे’. दोन्हीही बातम्या लोकसत्ताच्या आहेत. या बातम्यांना चौकटीत जोडताना त्याखाली ‘घर से निकलते ही – कुछ दूर चलते ही’ असंही लिहिलेलं आहे.

‘#घरकोंबडा कसा बोलतोय बघा…#ऑनलाईनपोपट’ असं लिहून ‘केशव ए’ या अकाऊंटवरून ही इमेज पोस्ट करण्यात आली आहे.

अशाच पद्धतीने दोन्ही बातम्या एकाखाली एक लाऊन विविध पोस्टवर कमेंट्समध्ये सुद्धा ही इमेज व्हायरल करण्यात येत आहे.

सोलापूरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असणाऱ्या विकास वाघमारे यांनी देखील फेसबुकवर याच विषयावर  पोस्ट टाकली आहे.  त्यात त्यांचा सूर हाच की उद्धव ठाकरे सुरुवातीला लष्कराची गरज नाही असं म्हणाले होते आणि आता ‘सुरुवातीपासूनच माझी केंद्रीय लष्कराचे मार्गदर्शन घ्यायची तयारी होती.’ असं सांगताहेत. बातमी लिहित असतानापर्यंत वाघमारे यांची पोस्ट १४९ जणांनी शेअर केली आहे.

पडताळणी:

‘उद्धव ठाकरेंनी आपल्या वक्तव्याच्या विरुद्ध दुसरं वक्तव्य केलंय’ असे दावे लोकसत्ताच्या ज्या दोन बातम्यांच्या आधारे केले जाताहेत, त्या दोन्हीही बातम्या ‘चेकपोस्ट मराठी’ने शोधल्या.

काय आहे त्या बातम्यांत?

पहिली बातमी आहे ८ मे २०२०ची. बातमीत लिहिलंय की, ‘शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात करोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा त्या जवानासारखाच आहे. इथे मला लष्कर आणायचं नाही. कोरोनाशी लढा आपण सगळे मिळून देत आहोत. ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.’

आणि दुसरी बातमी आहे २९ मे २०२०ची. बातमी मध्ये लिहिलंय, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युद्धपातळीवर रुग्णालयं उभारण्यासाठी लष्कराकडून मार्गदर्शन घेण्याची आपली तयारी होती असं सांगितलं आहे. आपल्याला युद्ध पातळीवर रुग्णालयं उभारली पाहिजेत असं मी आधीपासूनच सांगत होतो. लष्कराला बोलवायचं नाही, पण त्यांची मदत घेण्याची तयारी होती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते.’

वस्तुस्थिती:

लोकसत्ताच्या दोन्हीही बातम्या वाचल्यानंतर लक्षात आले की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही’ हे वाक्य वापरले होते. परंतु ते ‘महाराष्ट्रात शिस्तबद्धपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन व्हावे म्हणून सैन्याला बोलावणार’अशा अफवांना उत्तर म्हणून  ते वक्तव्य केलं होतं.

दुसऱ्या बातमीत ‘माझी सुरुवातीपासून लष्कराकडून मार्गदर्शन घेण्याची तयारी होती’ हे वाक्य त्यांनी वापरलं मात्र ते लॉकडाऊन कडक करण्यासाठी सैन्य बोलवावे म्हणून नसून लष्कराच्या धर्तीवर महाराष्ट्रात हॉस्पिटल उभारले जावेत आणि कोरोनाशी मुकाबला करावा असं ते सुचवत आहेत. त्यासाठी लष्कराचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत.

उद्धव ठाकरे यांची दोन्ही वक्तव्ये लष्कराशी संबंधित असली तरीही दोन्हींचे विषय वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी भूमिका बदलली, यु टर्न घेतला किंवा आता लष्कराला शरण वगैरे आले म्हणून पोस्ट फिरवणे चुकीचे आहे. अशा खोडसाळ आणि खोटे दावे करणाऱ्या पोस्ट्सनना आम्ही ‘चेकपोस्ट’वरच  अडवत आहोत

हेही वाचा:

लीक होऊन सोशल मीडियात फिरत असलेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच !

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा