Press "Enter" to skip to content

एडिटेड व्हिडिओच्या आधारे कन्हैया कुमारने इस्लामचा स्वीकार केल्याचा दावा व्हायरल!

काही दिवसांपूर्वीच भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारचा (Kanhaiya Kumar) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओच्या आधारे दावा केला जातोय की कन्हैया कुमारने स्वतःच आपण मुस्लिम असल्याची कबुली दिली आहे. कन्हैया कुमार इस्लामचा (Islam) स्वीकार केला असून हिंदू नाव धारण करून सर्वांना धोका देत आहेत.

Advertisement

“धूर्त कन्हैया कुमार का चोल बेनकाब ये मुल्ला है हिन्दू नाम रख कर सब की आँखों में धूल झोंक रहा हैयह देशद्रोही है यह देश का सबसे बड़ा गद्दार है मुसलमानों की एक बंद दरवाजा मीटिंग में अपनी असलियत बताई असलियत इनके ही कथन से स्पष्ट होता है कि ये मुसलमान है” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला गेलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओत कन्हैया कुमार म्हणताहेत, “आमचा इतिहास या भूमीशी जोडला गेलेला आहे. आम्ही सर्वच्या सर्वच (मुस्लिम) अरबमधून येथे आलेलो नाहीत. आम्ही याच मातीत वाढलो आहोत. येथेच लहानाचे-मोठे झालो आहोत. शांतता आणि समानतेचा संदेश देत असल्याने लोकांनी इस्लामचा स्वीकार केलाय. मस्जिदमध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. म्हणूनच आम्ही या धर्माचा स्वीकार केलाय. इतर धर्मात जातिव्यवस्था आहे आणि अस्पृश्यतेची प्रथा देखील आहे. अल्लाह खूप सामर्थ्यवान आहे आणि तो आपले सर्वांचे रक्षण करील”

व्हिडिओतील या संवादावरून कन्हैया कुमारने (Kanhaiya Kumar) खरंच इस्लामच्या (Islam) स्वीकाराची कबुली दिल्याचा भास होऊ शकतो. पण या गोष्टीत जराही तथ्य असतं तर तो राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या बातमीचा विषय ठरला असता. मात्र यासंबंधीची कुठलीही बातमी नसल्याने आम्ही पडताळणी सुरु केली.

युट्यूबवर किवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला सध्या व्हायरल होत असलेला ३५ सेकंदाचा व्हिडीओ ज्या व्हिडीओवरून बनवण्यात आलाय तो मूळ व्हिडीओ मिळाला. मूळ व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः तीन वर्षे जुना आहे. नांदेडमध्ये ‘डायलॉग विथ कन्हैया’ या कार्यक्रमात कन्हैया कुमारने मुस्लिम समाजातील बुद्धिवाद्यांशी संवाद साधला होता.

या कार्यक्रमात कन्हैया कुमार यांनी धर्माधारित राजकारणावर आपले विचार मांडले होते. त्यात त्यांनी देशाचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आज़ाद यांचा संदर्भ देऊन त्यांनी इस्लामविषयी काय म्हंटलंय ते सांगितलं होतं. म्हणजेच कन्हैया कुमार जे काही बोलताय ते अबुल कलाम आज़ाद यांचे शब्द आहेत, कन्हैयाने आपण स्वतः इस्लाम स्वीकारल्याची कबुली दिलेली नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की कन्हैया कुमारने इस्लामचा स्वीकार केल्याची कबुली दिली असल्याचा दावा करणारा व्हिडीओ एडिटेड आहे. हा व्हिडीओ कुठल्याही बंद दरवाज्याआडच्या मिटिंगमधला नसून महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या ‘डायलॉग विथ कन्हैया’ या खुल्या कार्यक्रमातील आहे.

हे ही वाचा- शेतकरी आंदोलनातील भारतविरोधी म्हणून व्हायरल व्हिडिओ अमेरिका आणि पाकिस्तानातले!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा