Press "Enter" to skip to content

जो बायडेन यांनी मोदी सरकारकडे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे का?

सोशल मीडियावर शेतकरी आंदोलना संदर्भातील एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. ग्राफिकमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन भाषण देताना दिसताहेत. ग्राफिकमध्ये दावा करण्यात आलाय की या भाषणात बायडेन यांनी मोदी सरकारकडे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे (biden supports farmer’s protest). या ग्राफिकवर ‘डीडी न्यूज’चा लोगो देखील आहे.

Advertisement
Source: Facebook

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना भारताची काळजी आहे. याउलट इथले पंतप्रधान आणि राष्ट्रपती उद्योगपतींचे गुलाम बनलेत, अशा कॅप्शनसह फेसबुकवर हे ग्राफिक शेअर करण्यात आलंय. फेसबुकवर इतरही अनेक युजर्स हेच ग्राफिक शेअर करताना दिसताहेत.

पडताळणी:

आम्ही गुगल एडव्हान्सड किवर्ड सर्चच्या मदतीने ‘डीडी न्यूज’च्या लोगोसह जो बायडेन यांच्या फोटोचा शोध घेतला असता आम्हाला ‘डीडी न्यूज’च्या युट्यूब चॅनेलवर संपूर्ण बातमीचा व्हिडीओ मिळाला. ३१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या बुलेटिनमधला हा फोटो आहे.

मूळ बातमी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शाब्दिक चकमकी संदर्भातील ही बातमी आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बायडेन यांनी कोरोना व्हायरचे वाढते प्रमाण असणाऱ्या भागात प्रचार करून तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला असल्याचं बातमीत सांगण्यात आलंय. ट्रम्प यांनी देखील बायडेन यांच्यावर जोरदार पलटवार केल्याचं, देखील बातमीत म्हटलंय.

‘डीडी न्यूज’च्या संपूर्ण बातमीमध्ये कुठेही भारताचा किंवा दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख नाही. उल्लेखनीय गोष्ट अशी की ‘डीडी न्यूज’च्या युट्यूब चॅनेलवर ही बातमी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी अपलोड करण्यात आली आहे. तोपर्यंत आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली नव्हती. तोपर्यंत शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरयाणामध्येच सुरु होतं.

त्यानंतर आम्ही बायडेन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला या विषयी बायडेन यांचं कुठलंही वक्तव्य मिळालं नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी शेतकरी आंदोलनावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बायडेन यांनी मोदी सरकारकडे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केल्याच्या (biden supports farmer’s protest) दाव्यांना कुठलाही आधार नाही. सोशल मीडियावरील व्हायरल ग्राफिक चुकीच्या दाव्यांसह शेअर केलं जात आहे.

हे ही वाचा- भारतीय वंशाच्या अहमद खान यांची जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा