इटलीने ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या’ म्हणजेच ‘WHO’च्या नियमावली विरुद्ध जाऊन ‘कोव्हीड१९’ मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्याने सत्य समोर आल्याचे दावे करणारे मेसेज सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतायेत. (italy autopsy covid19)
हा कुठला व्हायरस नसून हे जागतिक षडयंत्र आहे. ‘ऐमप्लीफाईड ग्लोबल 5G इलैक्ट्रोमैगनेटिक रेडिएशन’ मुळे हे सर्व घडत असल्याचा दावा त्यात केलाय.
व्हायरल मेसेज मधील ठळक दावे:
- इटलीने WHOच्या नियमावलीचे उल्लंघन करत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे पोस्टमॉर्टम केले. (italy autopsy covid19)
- त्यात समजले हे व्हायरसमुळे नव्हे तर बॅक्टेरियामुळे घडते आहे.
- त्या बॅक्टेरियामुळे रक्तात गाठी होतात आणि रक्त अडून राहते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.
- या बॅक्टेरिया ‘5G रेडीएशन’मुळे पसरत आहेत.
- Aspirin 100 mg हे औषध घेतल्यास यातून वाचू शकतो.
हे असे मेसेज व्हायरल होत असल्याचं ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील जैन, राजेश दुर्गे आणि ज्ञानेश मगर यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणी करण्यास सांगितली.
याच (italy autopsy covid19) माहितीच्या आधारे बनवलेला एक व्हिडीओसुद्धा फेसबुकवर व्हायरल होत आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने (italy autopsy covid19) दाव्यातील एकेका मुद्द्यावर व्यवस्थित पडताळणी केली. त्यात जे गवसले ते पुढीलप्रमाणे-
दावा १: इटलीने WHOच्या नियमावलीचे उल्लंघन करत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे पोस्टमॉर्टम केले.
पडताळणी: ‘जागतिक आरोग्य संघटना’ म्हणजेच ‘WHO’ने २४ मार्च रोजी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या शवाचे काय करावे, त्यास कशापद्धतीने हाताळावे याचे काही सल्ले दिले आहेत. हे सर्व सल्ले आहेत ‘सूचना’ किंवा ‘आदेश’ नाहीत. कारण WHOही मदतगार संस्था आहे. तिला आदेश देण्याचे किंवा कायदे बनविण्याचे अधिकार नाहीत.
तर त्या सल्ल्यांत शवाची पॅकिंग कशी करावी पासून त्याचे अंतिम संस्कार कसे करावेत याविषयी काही सल्ले आहेत. त्यात कुठेही ‘पोस्टमॉर्टम’ करू नये असा नियम लिहिलेला नाहीये.
दावा २: हे सर्व ‘व्हायरस’मुळे नव्हे तर ‘बॅक्टेरिया’मुळे घडते आहे.
पडताळणी: नाही, संशोधनाअंती हेच समोर आले आहे की शरीरातील हे सर्व बदल ‘व्हायरस’मुळे घडत आहेत. किंबहुना या व्हायरसच्या जीनोम स्ट्रक्चरचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आणि हा इतर व्हायरसपेक्षा वेगळा असल्याचेही विविध संशोधनातून समोर आले आहे. हा Severe Acute Respiratory Syndrome Coronavirus म्हणजेच ‘SARS CoV’ फॅमिली मधला असला तरीही हा नव्या सिक्वेन्सचा असल्याने त्यास ‘SARS CoV-2’ असे संबोधले जात आहे. म्हणूनच तो केवळ ‘कोरोना व्हायरस’ म्हणून नव्हे तर ‘नॉव्हेल कोरोना व्हायरस’ म्हणून ओळखला जातोय.
दावा ३: बॅक्टेरियामुळे रक्तात गाठी होतात आणि रक्त अडून राहते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.
पडताळणी: वरच्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले आहे की या सर्वस कारणीभूत ‘बॅक्टेरिया’ नसून ‘व्हायरस’ आहेत. परंतु हे खरे आहे की या रोगात रुग्णाच्या रक्तात ‘थ्रोम्बोसीस’ म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात. NCBIने पब्लिश केलेल्या रिसर्च पेपरनुसार ICU कंडीशनपर्यंत पोहचलेल्या ३१% रुग्णांत या गाठी आढळून आल्या आहेत. त्यांनी इतरही रुग्णांवर या दृष्टीने लक्ष देण्याचा सल्ला दिलाय.
दावा ४: बॅक्टेरिया ‘5G रेडीएशन’मुळे पसरत आहेत.
पडताळणी: एका ब्रिटीश वेबसाईटने यावर सविस्तर रिपोर्ट केला आहे. त्यात ते म्हणतायेत ”5G नेटवर्क’ हे अगदीच नवे तंत्रज्ञान आहे. आजवर केवळ ३४ देशांत हे नेटवर्क आहे. परंतु कोरोनाव्हायरस केसेस असणारे १८१ देश प्रकाशात आले आहेत.’ म्हणजेच या रोगाच्या फैलावाचा आणि ‘5G नेटवर्क’चा काहीएक संबंध नाही.
दावा ५: Aspirin 100 mg हे औषध घेतल्यास यातून वाचू शकतो.
पडताळणी: Aspirin हे ‘ब्लड थिनर’ म्हणजेच रक्त पातळ करण्यासाठी उपयोगी असल्याने व्हायरल दाव्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. कोरोना विषाणूसोबत लढताना केवळ रक्त पातळ करणे हा एकच महत्वाचा अजेंडा नाही. या व्यतिरिक्तसुद्धा लक्षनांवर इलाज होणे अत्यावश्यक असते. WHO आणि तज्ज्ञांच्या अभ्यासात अजूनही कोरोनाचा एकमेव असा कुठला रामबाण ईलाज सापडला नाही.
‘इटालियन मेडिसिन्स एजन्सी’ने सुद्धा कोव्हीड१९ रुग्णांच्या उपचारासाठी जी नियमावली बनवली आहे त्यात लक्षणे आणि वयानुसार औषधे कोणती वापरावीत याचे मार्गदर्शन केले आहे. यामध्ये कुठेही Aspirin चा उल्लेख आढळून येत नाही.
किंबहुना भारताच्या माहिती आणि जनसंपर्क संचालयाने सुद्धा हा Aspirin च्या उपचारपद्धतीचा दावा निकालात काढलाय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा निखालस खोटा, दिशाभूल करणारा आणि अशास्त्रीय असल्याचे समोर आले आहे. WHOने मृतकाचे शवविच्छेदन करू नये असा कुठलाही नियम सांगितला नाही. ना इटलीला या रोगामागे कुठला ‘बॅक्टेरिया’ सापडलाय. (italy autopsy covid19)
‘आयसीयु’ कंडीशनला पोहचलेल्या ३१% रुग्णांच्या रक्तात गाठी झाल्याचे आढळले आहे परंतु याचा कुठल्या ‘बॅक्टेरिया’शी किंवा ‘5G नेटवर्क’शी काहीएक संबंध नाही.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर एक कुठले रामबाण औषध अजूनही तयार झालेले नाही. प्रत्येक रुग्णाच्या वय आणि लक्षणानुसारच उपचार चालू आहेत.
हेही वाचा: चीनमध्ये ३ धरणे फुटून प्रलय आल्याचे दाखवण्यासाठी वापरला जातोय ९ वर्षे जुना व्हिडीओ!
[…] हेही वाचा: इटलीने ‘WHO’च्या नियमावली विरुद्ध ‘कोव… […]