सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय की बांगलादेशात इस्कॉन मंदिराचे पुजारी निताई दास (Nitai Das) यांची हत्या करण्यात आली आहे. निताई दास हे मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करत असत असे देखील सांगण्यात येतेय.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता UCA News च्या पोर्टलवर 4 जुलै 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी मिळाली. बातमीनुसार सदर फोटो पश्चिम बंगालमधील मायापुर येथील आहे. ‘इस्कॉन’च्या (ISKON) वतीने रमजान महिन्यादरम्यान इफ्तारचे (Iftar) आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी हा फोटो घेण्यात आला होता.
साधारणतः 165 मुस्लिम धर्मीय या इफ्तारसाठी उपस्थित होते. इस्कॉनकडून त्यांचे यथोचित आदरातिथ्य करण्यात आले. जमलेल्या मुस्लिम बांधवांनी संध्याकाळची नमाज देखील चंद्रोदय मंदिराच्या परिसरात अदा केली. इस्कॉनचे हे आयोजन आमच्यासाठी ‘आश्चर्यकारक’ आणि ‘हृदयस्पर्शी’ असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी सैफुल इस्लाम यांनी दिली होती.
इस्कॉनचे जनसंपर्क अधिकारी माधव गौरांग दास या आयोजनाविषयी माहिती देताना सांगतात,
“संस्थेच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. देशातील बहुतांश हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिमांना प्रवेश नसताना इस्कॉनच्या बहुतांश विधींमध्ये स्थानिक मुस्लिम समुदायाला मुक्त प्रवेश आहे. दरम्यान, इस्कॉनकडून मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीच्या आयोजनाची मात्र ही पहिलीच वेळ आहे”
फोटोतील व्यक्ती कोण आणि खरंच त्यांची हत्या झालीये?
इस्कॉनशी संबंधित युधिष्ठीर गोविंद दास हे 2016 साली मायापुर येथे इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होते. त्यांनी ‘बूम’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार फोटोतील व्यक्ती निताई दास (Nitai Das) हेच आहेत आणि ते अगदी सुखरूप आहेत. त्यांच्या हत्येचे दावे पूर्णतः चुकीचे आहेत.
निताई दास हे क्रोएशियातील पुला येथील रहिवासी आहेत. त्यांचे मूळ नाव इव्हान अँटिक असे असून निताई दास हे त्यांचे दीक्षा घेतल्यानंतरचे नाव आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की बांगलादेशात इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटो बांगलादेशमधला नसून पश्चिम बंगालमधील मायापुर येथील इस्कॉनकडून आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीचा आहे. फोटोतील निताई दास हे जिवंत असून सुखरूप आहेत.
हेही वाचा- रुद्राक्षाची माळ घातल्यामुळे हिंदू विद्यार्थ्याला ख्रिश्चन शिक्षकाने अमानुष मारहाण केली?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा: ज्या इस्कॉन मंदिराच्या पुजाऱ्याने इफ… […]