सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार हंस राज हंस (Hans Raj Hans) ‘रघुपती राघव राजा राम’ भजन गाताना दिसताहेत. व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उप-राष्ट्रपती वेंकैय्या नायडू (Venkaiah Naidu) देखील भजन ऐकत असल्याचे बघायला मिळतंय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की ‘रघुपती राघव राजा राम’ भजनातून ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ची लाईन काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी ‘जय श्रीराम, सिताराम’ अशी लाईन नव्याने जोडण्यात आली आहे. हा बदल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार देखील मानले जाताहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वयंसेविका अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या शीतल चोप्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय. त्यांचं ट्विट २७०० पेक्षा अधिक युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. युट्यूबवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला ‘हंस राज हंस लाईव्ह’ युट्यूब चॅनेलवर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी अपलोड करण्यात आलेला मूळ व्हिडीओ बघायला मिळाला. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमात हंस राज हंस यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ भजन गायले होते.
संपूर्ण व्हिडीओ ५ मिनिटे ५३ सेकंदांचा आहे. त्यातील २ मिनिटे २९ सेकंद ते २ मिनिटे ३९ सेकंद या १० सेकंदांच्या दरम्यान हंस राज हंस ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान’ ही लाईन गात असल्याचे बघायला मिळतंय. संपूर्ण भजनाचा व्हिडीओ आपण बघू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘रघुपती राघव राजा राम’ भजनातून ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ काढून त्याऐवजी ‘जय श्रीराम, सिताराम’चा समावेश करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. अशा प्रकारचा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मूळ व्हिडिओतील ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ची लाईन वगळून एडिटेड व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
हेही वाचा- दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जीपने ४ जणांना चिरडल्याचे सांगत व्हायरल होतायेत दिशाभूल करणारे दावे!
[…] […]