मेलॅमाईन (Melamine) या रसायनापासून फरशी, प्लास्टिक डिश, ग्लास तयार केले जातात. हेच रसायन जर दुधात मिसळले तर त्याची प्रोटीन मात्रा जास्त असल्याचे भासते. हे रसायन पोटात गेल्यास कॅन्सर सारखे महाभयंकर रोग होऊ शकतात. भारत सरकारने अशा प्रकारचे विष दुधात आणि अन्नपदार्थांत मिसळविण्यासाठी अधिकृत परवानगी दिली असल्याचे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक माधव देवस्थळी यांनी सदर व्हिडीओ व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की व्हायरल दाव्यातील काही बाबी सत्य आहेत. दरम्यान, भारत सरकारने खरंच दुधात आणि खाद्य पदार्थांमध्ये मेलॅमाईन (Melamine) मिसळण्याची परवानगी दिली आहे का, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजेच FSSAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी व्हायरल व्हिडीओ आणि त्यातील दावे चुकीचे असल्याचे सांगितले होते. शिवाय पशु खाद्य किंवा मानवी अन्नपदार्थांत मेलॅमाईन मिसळवण्यास बंदी असल्याचे सांगणारे प्रसिद्धी पत्रक जारी केले होते.
या पत्रकानुसार आणि FSSAI च्या अधिकृत ट्विटनुसार अन्नपदार्थांत मेलॅमाईन आढळण्याचे कमाल प्रमाण किती असावे याविषयी बंधने आहेत. जसे की एक लिटर दुधात केवळ १ मिली ग्राम इतके मेलॅमाईन (Melamine) आढळणे दुर्लक्षित करता येईल परंतु त्याहून अधिक प्रमाणात मेलॅमाईन वापरणे नियमबाह्य आहे. हे प्रमाण आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने ठरविलेले आहे. इतक्या नगण्य प्रमाणात मेलॅमाईनच्या वापराने कुठलीही हानी होण्याची शक्यता नसल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
‘जागतिक आरोग्य संघटनेने’ही याच प्रमाणावर शिक्कामोर्तब केलेले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओतील दावे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने अन्नपदार्थांत मेलॅमाईनच्या भेसळीवर पूर्णतः बंदी आणली आहे.
अन्नपदार्थांत मेलॅमाईनची कमाल मात्रा किती असावी याविषयी नियमावली आहे. ही मर्यादा आंतरराष्ट्रीय स्तरावरच ठरलेली आहे. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मेलॅमाईनचा वापर प्रतिबंधित आहे.
हेही वाचा: जागतिक आरोग्य संघटनेने पिशवीतल्या दुधामुळे ८७% भारतीय कॅन्सरग्रस्त होणार असल्याचा इशारा दिलाय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment