सोशल मीडियावर सैनिकांच्या ताब्यातील एका इसमाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा इसम महिलांच्या वेषभूषेमध्ये असून त्याला सैन्य अधिकाऱ्यांनी घेरलेले आहे. सोशल मीडियावर दावा केला जातोय की हा फोटो काश्मीर खोऱ्यातील असून वेषांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला भारतीय सैन्याने ताब्यात घेतले आहे.
उजव्या विचारधारेशी संबंधित लेखिका मधू पूर्णिमा किश्वर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो अपलोड केलाय. काश्मीरमध्ये २६ जुलै रोजीच्या एन्काऊंटरमध्ये दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.
शिवाय किश्वर यांनी ‘अल्ट न्यूज’ या फोटोचं देखील फॅक्ट चेक करेल काय, असा उपरोधिक सवाल करत ‘अल्ट न्यूज’ला फोटोमध्ये टॅग केलंय.
पडताळणी:
मधू किश्वर यांच्या ट्विटवर ‘अल्ट न्यूज’च्या मोहोम्मद झूबैर यांनी प्रतिसाद दिलाय. त्यात त्यांनी सांगितलंय की घटना २०१२ सालची असून अफगाणिस्थानमधील आहे. या घटनेचा काश्मीरशी काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे किश्वर यांनी अद्यापपर्यंत आपले चुकीचा दावा करणारे ट्विट मागे घेतलेले नाही.
आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला. आम्हाला ‘मिरर’च्या वेबसाईटवर ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो वापरण्यात आला असल्याचे आढळून आले.
मिररच्या बातमीनुसार तालिबान फुटीरतावाद्यांनी अफगाणिस्थानमध्ये तैनात असलेल्या अनेक देशांच्या संयुक्त सैन्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. परंतु अफगाणिस्थानच्या गुप्तचर खात्याने हा डाव उधळून लावत महिलांच्या वेशभूषेतील फुटीरतावाद्यांना ताब्यात घेतले.
मिररच्या बातमीमध्ये फोटोचे क्रेडिट ‘असोशिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही ‘असोशिएटेड प्रेस’च्या वेबसाईटवर देखील सदर फोटो शोधला. वेबसाईटवरील माहितीनुसार अफगाण सुरक्षा दलांनी काबूलच्या पूर्वेकडील लगमन प्रांतातील मेहतरलाम येथून महिलांच्या वेषातील ८ तालिबानी फुटीरतावाद्यांना ताब्यात घेतले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये महिलांच्या वेषातील दहशतवाद्याला ताब्यात घेतलेले नाही. व्हायरल फोटो अफगाणिस्थानमधील असून सध्याचा नसून २०१२ सालचा म्हणजेच ९ वर्षांपूर्वीचा आहे.
हेही वाचा- मुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत? वाचा सत्य!
Be First to Comment