उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 3 जून रोजी दोन समुदायांमध्ये मोठा हिंसाचार (Kanpur Violence) उसळला होता. याप्रकरणी हयात जफर हाशमी यास अटक देखील करण्यात आली आहे. हाशमीच्या इतर साथीदारांची चौकशी देखील करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर कानपुर हिंसाचाराच्या घटनेच्या संदर्भाने एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एका घरासमोरील शेड बुलडोजरच्या साहाय्याने हटविले जात असताना बघायला मिळतेय. हे घर कानपूर हिंसाचारात सहभागी आरोपीचे असल्याचा दावा केला जातोय.
पडताळणी:
कानपुर येथील हिंसाचाराच्या (kanpur violence) प्रकरणी पोलिसांकडून 40 संशयितांची पोस्टर जारी करण्यात आली आहेत. मात्र या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आल्यासंबंधीच्या बातम्या मात्र आम्हाला माध्यमांमध्ये बघावयास मिळाल्या नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली.
व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या सहाय्याने शोधल्या असता आसिफ देहलवी या ट्विटर युजरकडून 12 मे 2022 रोजी हा व्हिडीओ पोस्ट केला गेला असल्याचे बघायला मिळाले. व्हिडीओ शेअर करत असताना देहलवी यांनी पोलिसांच्या उपस्थितीत आपल्या दुकानावर बुलडोजर चालविण्यात आले असल्याचे सांगितले आहे. हे भाजपचे घाणेरडे राजकारण असल्याचा आरोप देखील या ट्विटमध्ये करण्यात आला होता.
पडताळणी दरम्यान आम्हाला इंडिया टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर 12 मे 2022 रोजीचा व्हिडीओ रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टमध्ये दिल्लीमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान चार वेगवेगळ्या भागातील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधातील मोहिमे दरम्यान कारवाईच्या चौथ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणची अतिक्रमणे बुलडोजरच्या साहाय्याने हटविण्यात आल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडीओ दिल्लीतील अतिक्रमण विरोधी मोहिमे दरम्यानचा आहे. या व्हिडिओचा कानपुर हिंसाचारातील आरोपींशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- मुस्लिम तरुणाने शिवीगाळ आणि मारहाण करत केले साधूचे मुंडन? वाचा सत्य !
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment