Press "Enter" to skip to content

खरंच फोर्ब्सने जगातील सुशिक्षित राजकीय नेत्यांच्या यादीत राहुल गांधी यांचा समावेश केलाय?

सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जगातील सुशिक्षित राजकीय नेत्यांची यादी जाहीर केली असून राहुल गांधी यांनी या यादीत सातवा क्रमांक (rahul gandhi in forbes list) पटकावला असल्याचं सांगितलं जातंय.

Advertisement

फोर्ब्सच्या यादीत सातवा क्रमांक मिळवून जगात देशाची शान वाढविल्याबद्दल राहुल गांधी यांचं अभिनंदन करण्यात येतंय. त्यांना शुभेच्छा दिल्या जाताहेत. फेसबुक युजर श्रीकांत गडिलकर यांची यासंदर्भातील पोस्ट १०८ युजर्सकडून शेअर करण्यात आलीये.

https://www.facebook.com/photo.php?fbid=4369973609740136&set=a.264258520311686&type=3&theater

अर्काइव्ह पोस्ट

त्याशिवाय सोशल मीडियावर इतरही अनेक युजर्सकडून साधारणतः हाच कॉपी पेस्ट दावा करण्यात येतोय.    

https://www.facebook.com/photo.php?fbid=136758754842570&set=a.112702820581497&type=3&theater

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम फोर्ब्सच्या वेबसाईटला भेट दिली. फोर्ब्सने खरंच अशा प्रकारच्या कुठल्या यादीत राहुल गांधींचा समावेश केलाय (rahul gandhi in forbes list) का हे शोधण्याचा प्रयत्न केला.

फोर्ब्सच्या वेबसाईटवर आम्हाला ‘फोर्ब्स लिस्ट’ नावाच्या सेक्शनमध्ये फोर्ब्सकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारातील याद्यांची माहिती मिळाली. जसे की ‘जगभरातील प्रभावशाली व्यक्तींची यादी’, ‘जगभरातील १०० प्रभावशाली महिलांची यादी’, ‘आशिया खंडातील प्रभावशाली उद्योजक महिलांची यादी’ इ.

मात्र या वेबसाईटवर कुठेही जगातील सुशिक्षित राजकीय नेत्यांच्या यादीविषयी उल्लेख सापडला नाही. आम्ही फोर्ब्सच्या सोशल मीडिया हँडलवर देखील शोधाशोध केली मात्र, तिथे देखील अशा प्रकारची कुठलीही यादी सापडली नाही.

त्यानंतर आम्ही राहुल गांधी यांच्या शिक्षणाविषयीची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार ते 1989 साली सीबीएसई बोर्डामधून 12 वी उत्तीर्ण झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी 1994 साली फ्लोरिडाच्या रोलिन्स कॉलेजमधून बीए पूर्ण केले आणि त्यानंतर 1995 मध्ये केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमधून डेवलपमेंट स्टडीमध्ये एमफिलचे शिक्षण घेतले आहे.

Rahul Gandhi educational qualification Declaration check post marathi

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की फोर्ब्सकडून अनेक वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या जातात, मात्र फोर्ब्स ‘जगभरातील सुशिक्षित राजकारणी किंवा नेते’ अशा प्रकारची कुठलीही यादी जाहीर करत नाही.

सहाजिकच जी यादी प्रसिद्धच केली जात नाही, त्यात राहुल गांधींच्या समावेशाचं काहीही कारण नाही. म्हणजेच सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या संदर्भात केला जाणारा दावा चुकीचा आहे. ह्या दाव्याच्या खरेपणासंबंधी कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

हे ही वाचा- राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा