सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत संतप्त जमावाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात येत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की मारहाण करण्यात येत असलेली व्यक्ती काँग्रेसचे उमेदवार फूल सिंह बरैया असून हिंदूविरोधी वक्तव्य दिल्यामुळे जमावाने त्यांना चोप (phool singh baraiya beaten up) बेदम मारहाण केली आहे.
‘सॅफ्रन टाईम्स नाऊ’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ जवळपास १६०० पेक्षा अधिक युजर्सकडून शेअर केला गेलाय.
ट्विटरवर देखील हा व्हिडीओ अशाच दाव्यांसह शेअर केला गेला होता.
पडताळणी:
काँग्रेस नेते फूल सिंह बरैया यांना झालेल्या मारहाणीचा दावा (phool singh baraiya beaten up) करणाऱ्या व्हिडिओच्या सत्यतेच्या पडताळणीसाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन ते रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले. आम्हाला ANI या वृत्तसंस्थेच्या युट्यूब चॅनेलवर १९ ऑक्टोबर २०१६ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार, “केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि त्यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालच्या आसनसोल जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. वाद-विवादा दरम्यान भाजप कार्यकर्त्याला मारहाण देखील करण्यात आली आणि त्याचे कपडे देखील फाडण्यात आले. जमावाने पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दगडफेक केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली.”
याच घटनेसंदर्भात २० ऑक्टोबर २०१६ रोजी एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर देखील एक बातमी प्रकाशित झाल्याचे आम्हाला आढळून आले. या बातमीत बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ देखील आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा याच व्हिडीओचा भाग असून व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती बंगाल भाजपचे नेते सुब्रत मिश्रा आहेत.
‘एनडीटीव्ही’च्या बातमीनुसार बाबूल सुप्रियो यांच्या आसनसोल मतदारसंघात चार लोकांना गाय चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याविरोधात सुप्रियो आणि त्यांच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बंगाल सरकारमधील मंत्री मलय घटक यांच्या घराच्या बाहेर जाऊन घोषणाबाजी केली होती. याच दरम्यान भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ जवळपास चार वर्षे जुना आहे. घटना पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील असून घटनेचा हिंदूविरोधी वक्तव्याच्या दाव्याशी देखील काहीही संबंध नाही.
व्हिडिओत जमावाकडून ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती काँग्रेस नेते फूल सिंह बरैया नसून भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते सुब्रत मिश्र आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वादात बंगाल भाजपचे नेते सुब्रत मिश्रा यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा हा व्हिडीओ आहे. हाच व्हिडीओ व्हायरल करत गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना मारहाण होत असल्याचे दावे होत होते. त्यावेळीही ‘चेकपोस्ट मराठी’ने सत्यता स्पष्ट करणारी बातमी केली होती.
हे ही वाचा- मुकेश अंबानींनी नातू झाल्याच्या आनंदात कोरोना नियमांचे केले उल्लंघन? मुख्यमंत्रीसुद्धा सामील?
[…] हेही वाचा- हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्र… […]