Press "Enter" to skip to content

काँग्रेस प्रवक्त्याने लाईव्ह टीव्हीवरील चर्चेत केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक?

सोशल मीडियावर एका चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये चर्चेच्या पॅनेलवरील एका सदस्याला प्रश्न विचारला जातोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना जे ‘हिंदू कार्ड’ खेळले आहे, त्याचा सामना  राहुल गांधी (Rahul Gnadhi) करू शकतील का?

Advertisement

प्रश्नाचे उत्तर देताना पॅनेलचे सदस्य म्हणतात, “हे खूपच अवघड आहे. राहुल गांधीच काय, कुणासाठीही हे अवघड आहे. नरेंद्र मोदी हिरो आहेत. आजही देशात 10-15 कोटी लोक असतील, जे त्यांना देव मानतात. त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घ्यायची लोकांची तयारी नाही…..”

संपूर्ण उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. सोशल मीडियावर दावा केला जातोय की व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव करणारी ही व्यक्ती काँग्रेसचे प्रवक्ते आहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता ‘फर्स्ट इंडिया न्यूज’चा लोगो बघायला मिळतोय. याआधारे व्हिडिओचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ‘फर्स्ट इंडिया न्यूज’च्या युट्यूब चॅनेलवर आम्हाला संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ बघायला मिळाला.

‘फर्स्ट इंडिया न्यूज’च्या 14 डिसेंबर रोजीच्या चर्चेतील हा व्हिडीओ आहे. संपूर्ण चर्चेतील 55 मिनिटे 36 सेकंद या वेळेवर व्हायरल क्लिपमधील प्रश्न आणि त्याचे उत्तर बघायला मिळतेय. प्रश्नाचे उत्तर देणारी व्यक्ती काँग्रेस प्रवक्ता नसून चॅनेलचे प्रमुख जगदीश चंद्र आहेत. चर्चेच्या सुरुवातीलाच अँकरने त्यांचा परिचय करून देताना ते चॅनेलचे प्रमुख असल्याचे सांगितले आहे.

‘फर्स्ट इंडिया न्यूज’च्या ट्विटर हँडलवरून यापूर्वी देखील जगदीश चंद्र यांचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. त्यात ते चॅनेलचे प्रमुख असल्याचे सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारी व्यक्ती काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नसून ‘फर्स्ट इंडिया न्यूज’ या चॅनेलचे प्रमुख आहेत. त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- विराट कोहली आणि बीसीसीआय दरम्यानच्या वादात राहुल गांधींनी विराट कोहलीला पाठिंबा दिलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    ×

    Powered by WhatsApp Chat

    × न्यूज अपडेट्स मिळवा