Press "Enter" to skip to content

अमरिंदर सिंग यांनी भाजप पक्ष प्रवेशासाठी अमित शहांची भेट घेतलीये का?

दोन दिवसांपूर्वीच पंजाबचे मुखमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही महिन्यांमधील घटना-घडामोडींमुळे आपल्यामध्ये अपमानित झाल्यासारखी भावना निर्माण झाल्याचे देखील त्यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तेव्हापासून अमरिंदर सिंग आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार का, याविषयी देखील चर्चा झडताहेत.

पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांचा एकमेकांसोबतचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोच्या आधारे दावा करण्यात येतोय की अमरिंदर सिंग यांनी भाजप पक्ष प्रवेशासाठी भाजप नेते अमित शहांची भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला २७ जून २०१९ रोजी ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर करण्यात आला असल्याचे आढळून आले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी “आज” दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, अशी माहिती फोटोच्या कॅप्शनमध्ये देण्यात आली होती.

जून २०१९ मधील फोटोत भेट ‘आज’ घेण्यात आल्याचा उल्लेख असल्याने फोटो २७ जून २०१९ रोजीचा असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे किवर्ड सर्च केलं असता आम्हाला न्यूज १८ हिंदीच्या वेबसाईटवरील बातमीत देखील हा फोटो बघायला मिळाला. 

या बातमीनुसार पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीत अमरिंदर सिंग यांनी अमित शहांना करतारपूर कॉरिडॉरच्या (Kartarpur Corridor) निर्मितीमध्ये भारताकडून पूर्ण करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. तसेच या कामाला गती देण्यासाठी निधीचे वाटप अधिक जलदगतीने करण्याची विनंती केली.

आम्हाला खुद्द अमरिंदर सिंग यांच्याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून २७ जून २०१९ रोजी अपलोड करण्यात आलेल्या ट्विटमध्ये देखील व्हायरल फोटो बघायला मिळाला. ट्विटमध्ये अमरिंदर सिंग यांनी अमित शाह यांच्या भेटीची माहिती दिली होती. या भेटीत करतारपूर कॉरिडॉर आणि ड्रग्जच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी भाजप पक्ष प्रवेशासंदर्भात अमित शाह यांची भेट घेतल्याचे दावे चुकीचे आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि अमरिंदर सिंग यांच्या भेटीचा साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.

हेही वाचा- मोदींच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या व्हिडिओत भाजपने वापरली अमेरिकेतील इमारतीची क्लिप!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा