भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी आपल्या मुलीला आणि नातीला हज यात्रेसाठी पाठवले आहे. मुलगी आणि नात यांची पाठवणी करतानाचा हैद्राबाद विमानतळावरचा म्हणून एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.
‘हिंदुओं को मुसलमानों के खिलाफ भड़काने वाले कट्टर हिन्दू नेता सुब्रमण्यम स्वामी हैदराबाद एअरपोर्ट पर अपनी सगी बेटी और नवासी को हज पर रवाना करते हुए.’
अशा कॅप्शनसह बुरखा घातलेल्या महिलांसह उभे असलेल्या सुब्रमण्यम स्वामींचा फोटो व्हायरल होतोय.
हे दावे फेसबुकवर खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल होताना दिसतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील गिरकर यांनी व्हॉट्सऍपवर हेच स्क्रिनशॉट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे लक्षात आले की सदर दावे २०१८ सालापासून व्हायरल होत आहेत. फेसबुक ट्विटर सारख्या समाज माध्यमांत तेव्हाही या दाव्यांनी धुडगूस घातला होता.
- ज्या फोटोचा वापर करून हे दावे केले जातायेत त्याचीच पडताळणी करण्यासाठी आम्ही तो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा हा फोटो ज्या ट्विट द्वारे समोर आला ते ट्विट आम्हाला सापडले.
- जगदीश शेट्टी यांनी ट्विटमध्ये त्याविषयी माहिती दिलीय. ते म्हणतायेत,
‘बेंगलुरू विमानतळावरील हे दृश्य पहा! डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे कौतुक करण्यासाठी मुस्लिम महिला समोर आल्या आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. तिहेरी तलाक बंद करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं.’
- २०१८ सालापासून हे दावे व्हायरल होत असल्याने साहजिकच हिंदी इंग्रजी माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. ‘अल्ट न्यूज’ या फॅक्टचेक वेबसाईटने जगदीश शेट्टी यांना संपर्क साधून शहानिशा केली असता त्यांनी स्वतः हा फोटो काढल्याचे सांगितले आहे.
- व्हायरल दाव्यात सदर फोटो हैदराबाद विमानतळावरचा असल्याचे सांगितले आहे परंतु ४ मे २०१८ रोजी स्वामी बंगळूरुमध्ये होते असे टाईम्स नाऊच्या बातमीतून लक्षात येते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सदर फोटो आताचा नसून तब्बल तीन वर्षांपूर्वीचा आहे. त्यात दिसणाऱ्या मुस्लीम महिला सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या नात्यातील नाहीत. त्यांनी केवळ स्वामींसोबत फोटो घेण्यासाठी आग्रह धरला होता.
सुब्रमण्यम स्वामी यांना दोन मुली आहेत. थोरल्या गीतांजली स्वामी (Gitanjali Swamy) आणि धाकटी सुहासिनी हैदर (Suhasini Haidar). सुहासिनी यांनी मुस्लीम धर्मीय नदीम हैदर यांच्याशी विवाह केला आहे. सुहासिनी हैदर या नामांकित पत्रकार आहेत.
हेही वाचा: भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी शेअर केला फिलिपिन्सचा फोटो!
Be First to Comment