सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोत लाल रंगाची टॅक्सी आणि खाकी ड्रेसमधील टॅक्सी चालक बघायला मिळतोय. टॅक्सीवर बेस्टचा लोगो आणि ‘बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी’ असं देखील लिहिलेलं बघायला मिळतंय. दावा केला जातोय की बेस्टने मुंबईतील घाटकोपर येथून ‘इलेक्ट्रिक टॅक्सी’ (Best Electric Taxi) सेवा सुरु केली आहे.
पडताळणी:
बेस्टकडून जर अशा प्रकारची सेवा सुरु करण्यात आली असती, तर यासंदर्भातील बातम्या निश्चितच बघायला मिळाल्या असत्या. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमांमध्ये अशा प्रकारची कुठलीही बातमी नसल्याने आम्ही यासंदर्भात शोध घायला सुरु केला.
किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला बेस्टकडून ट्विटरवर जारी करण्यात आलेलं आवाहन बघायला मिळालं. सोशल मीडियावरील व्हायरल फोटो आणि दाव्याच्या संदर्भाने बेस्टकडून हे आवाहन करण्यात आलं होतं.
बेस्टच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की सोशल मीडियावरील दावे चुकीचे आहेत. बेस्ट उपक्रमाद्वारे अशा प्रकारची कुठलीही सेवा सुरु करण्यात आलेली नसून नजीकच्या भविष्यकाळात देखील अशा प्रकारची सेवा सुरु करण्याबाबतची काहीही शक्यता नाही, असं बेस्टकडून सांगण्यात आलं आहे.
बेस्टच्या प्रवाशांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या छायाचित्रांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन देखील बेस्टकडून करण्यात आलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की बेस्ट उपक्रमाद्वारे मुंबईतील घाटकोपर येथून ‘इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा’ (Best Electric Taxi) सुरु करण्यात आलेली नाही. ना नजीकच्या भविष्यकाळात अशी सेवा सुरु करण्याची कुठलीही योजना आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- गोळ्यांच्या कॅप्सूलमध्ये खिळे? धक्कादायक व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment