कैलास मानसरोवर (kailash manas sarovar) जवळ नागमणीचे रक्षण करणारा एक नाग आढळला, त्यास अष्टपैड (ashtapad) असे म्हणतात. कॅमेरा झूम करून समुद्र सपाटी पासून १८३० फुट उंचावर असणारे हे दुर्मिळ दृश्य टिपण्यात आले. अशा दाव्यांसह एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.
‘पहाटे साडेतीन वाजता समुद्रसपाटीपासून 1830 फूट उंचावरील कॅमेरा झूम असलेल्या कैलास मानसरोवरासह व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये नागामणिशी एक नागा संबंध आहे, ज्याला अष्टपैड देखील म्हटले जाते, जे अत्यंत दुर्मीळ दृश्य आहे. कृपया प्रत्येकासह सामायिक करा जेणेकरुन अधिक लोक ते पाहू शकतील.’
काळ्याकुट्ट अंधारात चमकणारा मणी आणि त्याच्याजवळ फुत्कार काढत असलेला नाग. असे दृश्य असणाऱ्या व्हिडीओसह वरील मजकूर व्हायरल होतोय.
हिंदीभाषिक लोक ट्विटरवर देखील हा व्हिडीओ पोस्ट करून त्याच प्रकारचे दावे करताना आढळत आहेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक साहेबराव माने, रविंद्र खांबेकर आणि राजेंद्र काळे यांनी युट्युब आणि व्हॉट्सऍप सारख्या माध्यमांवर देखील हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
जवळपास ४ वर्षांपासून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. आम्ही व्हायरल व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले आणि व्हिडीओसोबत करण्यात येत असलेल्या दाव्यांना तर्काच्या आधारे पडताळण्याचा प्रयत्न केला.
- समुद्रसपाटीपासून तब्बल १८३० फुट उंचावर असणारे दृश्य खरेच अशा पद्धतीने टिपता येईल का?
- तेवढ्या दर्जाची टेली लेन्स वापरली असे काही क्षणासाठी गृहीत धरले तरीही टिपलेल्या दृश्याचा कोन हा खालून वर असा असेल. या व्हिडीओमध्ये ते दृश्य समांतर दिशेला बसून टिपल्यासारखे भासत आहे.
- व्हायरल दाव्यात केवळ एकाच नागाचा उल्लेख आहे परंतु व्हिडीओमध्ये दोन साप दिसतायेत.
- व्हायरल दाव्यात व्हिडीओतील नागास/ दृश्यास ‘अष्टपैड’ (ashtapad) असे म्हंटले आहे. परंतु हा शब्द कुठल्याही शास्त्रात वा विज्ञानात नागाविषयी वापरल्याचे आढळत नाही. तिबेट मध्ये ‘अष्टपॅड‘ नावाचे ठिकाण आहे. जैन आणि हिंदू धर्मीय या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून जातात.
- सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘नागमणी’ नावाची गोष्ट विज्ञानाच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे. नागमणी विषयी असणाऱ्या गूढ कथा, काल्पनिक चित्रपट यांमुळे ‘काळी जादू’ मानणाऱ्यांच्या दुनियेत या मण्यास मोठा भाव आहे.
- याच पैशाच्या अमिषापायी अनेक गारुडी नागाच्या डोक्याला कापून त्यात चमकदार दगड ठेवतात व आपल्यासमोर काढून दाखवत त्यास नागमणी म्हणतात. खालील व्हिडीओमध्ये आपण ते पाहू शकता.
- या व्यतिरिक्त नैसर्गिकरीत्या देखील अशा प्रकारचा नागाच्या डोक्याजवळ छोटासा चमकदार खडा आढळतो. त्यास देखील नागमणी म्हणतात. परंतु या मण्याला जोडलेल्या अंधश्रद्धेस देखील विज्ञानाने खोटे पाडले आहे.
- सर्पकुळातील प्राण्यांवर अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेस ‘हरपेटोलॉजी’ असे म्हणतात. हरपेटोलॉजीस्ट डॉ. धनशेखरन त्या नैसर्गिक नागमण्यास लाळ आणि विषाचा साठून तयार झालेला खडा असल्याचे सांगतात.
- IJSDR च्या पेपरनुसार नैसर्गिकरीत्या आढळत असणारा तो विषाचा आणि लाळेचा खडा अगदी तांदळाच्या दाण्याएवढा छोटासा असतो.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे चुकीचे, निराधार आणि अंधश्रद्धा पसरवणारे असल्याचे आढळून आले आहे.
नागाचे जोडपे असलेल्या कुठल्याशा दगडाच्या सापटीत LED बल्बसदृश्य उपकरण टाकून काहीशा अंतरावरून मोबाईल कॅमेऱ्याने शूट केलेला तो व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. कारण हा व्हिडीओ शूट करताना डिजिटली नव्हे तर ऑप्टीकली झूम केल्याचे व्हिडीओ क्वालिटीवरून जाणवत आहे.
अशा फसव्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या दाव्यांविषयीची माहिती ९१७२०११४८० या आमच्या अधिकृत क्रमांकावर व्हॉट्सऍप मेसेजच्या माध्यमातून आम्हाला द्या. आम्ही वैज्ञानिक दृष्टीने त्याची तथ्य तपासणी करू.
हेही वाचा: ग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी!
[…] […]
[…] […]