Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्री अशोक गेहलोत सोनिया गांधींना नमन करत उभे राहिलेत का ?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर  व्हायरल होतोय. फोटोत अशोक गेहलोत डोळे बंद करून शांत आणि एकाग्र चित्ताने उभे असल्याचे दिसताहेत. गेहलोत यांच्या अगदी समोरच असलेल्या एलसीडी सेटवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी दिसताहेत.

सोशल मिडीयावर दावा केला जातोय की अशोक गेहलोत सोनिया गांधींना नमन करताहेत. आशिष नावंदर नामक फेसबुक युजरने हा फोटो पोस्ट केलाय. त्यातल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की ‘एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री ची ही हालत..तेही विदेशी बाई समोर..काय लाचारी असेल ?

Advertisement
https://www.facebook.com/photo.php?fbid=3639668052714970&set=a.328632733818535&type=3&theater

ट्विटरवर देखील हाच फोटो शेअर करण्यात येतोय.

वनिता जैन यांनी हा फोटो शेअर करताना प्रश्न विचारलाय की राजस्थानचे मुख्यमंत्री बसायला घाबरताहेत की ते माता जी प्रतीचा आपला आदर दाखवताहेत? वनिता जैन यांचं ट्वीट २९९ युजर्सनी रिट्वीट केलंय.

सुब्बा राव या हँडलवरून टाकण्यात आलेल्या फोटोचं कॅप्शन आहे की, “बरं तरी सोनिया गांधींनी अशोक गेहलोत यांना बेंचवर उभा राहायला सांगितलं नाही.”

ट्विटरवर अशा अनेक हँडल्सने हा फोटो शेअर केलाय आणि विशेष म्हणजे बहुतांश ट्विट्स एकसारखेच म्हणजे एकाच कॅप्शनसह आहेत.

kolaj of tweets showing ashok gehlot standing in front of sonia gandhi
Source: Twitter

पडताळणी:

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या फोटोची सत्यता पडताळून बघण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चची मदत घेतली. त्यावेळी हा फोटो आम्हाला खुद्द अशोक गेहलोत यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या पोस्टच्या रुपात मिळाला.

अशोक गेहलोत यांच्या ट्वीटवरून जी माहिती मिळाली त्यानुसार हा फोटो २३ जून रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीमधला आहे. भारत-चीन तणावात देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २ मिनिटांचे मौन पाळण्यात आले त्यावेळचा हा फोटो आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल होत असलेला फोटो काँग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीतील असून भारत-चीन तणावाच्या परिस्थितीत देशासाठी लढताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतानाचा आहे. फोटोचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास स्वतः सोनिया गांधी यांची मान झुकल्याचे लक्षात येईल. त्यामुळे गेहलोत यांच्या ट्विट मध्ये नक्कीच तथ्य आहे.

एकुणात काय? राजस्थानचे मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना नव्हे, तर देशाच्या वीर जवानांना नमन करताहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

हेही वाचा: ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’च्या को-प्रोड्युसरने राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्यासाठी वापरला एडीटेड व्हिडीओ!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा