सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये एका सफेद रंगाच्या खोलीसमोर हिरव्या रंगाची लोखंडी रेलिंग बघायला मिळतेय आणि त्याच्याच बाजूला असलेल्या खड्ड्यात नंदीची मूर्ती दिसून येतेय.
सोशल मीडियावर दावा केला जातोय की सफेद रंगाची खोली हा मशिदीचा भाग असून उत्तखनना दरम्यान त्याखाली हिंदू देवता नंदीची मूर्ती मिळाली आहे. देशभरातील मशीद आणि मजारची हीच अवस्था आहे. “हर मस्जिद -मजार की यही कहानी है…नीचे दबी हिंदुत्व की ही निशानी है…” अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जातोय.
फेसबुकवर देखील हा फोटो अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो व्यवस्थितरित्या बघितला असता एक गोष्ट अगदी सहज लक्षात येते ती म्हणजे लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये असलेल्या मुर्त्या या हिंदू देवतांच्या मुर्त्यांसारख्या आहेत. म्हणजेच सफेद रंगाची ती खोली मशिदीचा भाग असण्याची शक्यता याच ठिकाणी मावळते.
व्हायरल फोटो नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘लॉस्ट टेम्पल्स’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून 4 सप्टेंबर 2021 रोजी हे फोटोज पोस्ट करण्यात आले असल्याचे आढळून आले.
ट्विटच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सदर फोटो नमक्कल जिल्ह्यातील मोहनूरच्या सेलंडीअम्मन (Sellandiamman) मंदिराचा आहे. या मंदिराच्या कंपाउंडच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान नंदीची मोठी मूर्ती सापडली.
तमिळ न्यूज वेबसाइट विकटनने देखील नमक्कलमधील मंदिराच्या कामादरम्यान नंदीची मूर्ती सापडल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. सापडलेली मूर्ती खराब झालेली आहे, त्यामुळे ती पाँडिचेरी मंदिराशी संबंधित मूर्ती असण्याची अधिक शक्यता देखील या बातमीत वर्तविण्यात आली आहे.
तामिळ वृत्तवाहिनी पुथिया थलाइमुराई टीव्हीने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे. बातमीनुसार फोटो पॉंडिचेरीच्या नमक्कल जिल्ह्यातील सेलंडीअम्मन मंदिराचा आहे. मंदिराच्या डागडुजीच्या कामादरम्यान नंदीची एक हजार वर्ष जुनी मूर्ती सापडली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या मूर्तीविषयी अधिक संशोधन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी दरम्यान स्पष्ट झाले आहे की उत्खननाच्या वेळी मशिदी खाली हिंदू देवता नंदीची मूर्ती सापडल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. नंदीची मूर्ती सापडली आहे, पण त्या ठिकाणी पूर्वीपासूनच मंदिर आहे.
हेही वाचा- भाजप सरकारच्या काळात पाडण्यात आलेल्या मंदिराचे खापर अशोक गेहलोत यांच्या माथ्यावर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- उत्खननावेळी दर्ग्याखाली हिंदू देवता … […]