सोशल मीडियावर कथितरित्या गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांना लिहिलेले पत्र व्हायरल होतेय. या पत्रामध्ये अमित शाह भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे कौतुक करत असल्याचे बघायला मिळतेय.
नुपूर शर्मा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारात तसेच ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीचे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगतानाच अमित शाह नुपूर शर्मा यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची शिफारस करत असल्याचे सांगितले जातेय.
चेकपोस्ट मराठीचे वाचक अंबादास जरारे यांनी व्हॉट्सऍपवर देखील हे पत्र व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल पत्राची सत्यता पडताळण्यासाठी किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून जून 2021 मध्ये करण्यात आलेले एक ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये सोशल मीडियावर अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अमित शाह यांना लिहिलेले म्हणून व्हायरल होत असलेले पत्र फेक असल्याचे सांगण्यात आले होते.
सध्या अमित शाह यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले म्हणून व्हायरल होत असलेले पत्र आणि जून 2021 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फेक घोषित केलेल्या पत्रात अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही पत्रांमध्ये 28647021 हा एकच HMP नंबर आहे. शिवाय पत्रामध्ये काही व्याकरणाच्या चुका देखील बघायला मिळताहेत, ज्या सामान्यतः अधिकृत पत्रांमध्ये नसतात.
अमर उजालाच्या बातमीनुसार उत्तराखंड सरकारकडून देखील हे पत्र फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह राधा रतूड़ी यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. रतूड़ी यांच्या आदेशावरून एसटीएफने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून माजी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची शिफारस केलेली नाही. सोशल मीडियावरील अमित शाह यांच्या नावाने व्हायरल पत्र फेक आहे.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचा उल्लेख शहीद असा केला? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment