सोशल मीडियावर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात येतोय. दावा केला जातोय की ही व्यक्ती भारतीय वंशाचे अहमद खान असून, त्यांची जो बायडन यांचे राजकीय सल्लागार (ahmed khan joe biden) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्काइव्ह पोस्ट
फेसबुकवर देखील अनेक युजर्स हे फोटोज मोठ्या प्रमाणात शेअर करताहेत.
पडताळणी:
सोशल मीडियावर व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम अहमद खान नामक व्यक्तीची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राजकीय सल्लगारपदी नियुक्ती (ahmed khan joe biden) करण्यात आल्यासंबंधीच्या बातम्या शोधल्या. परंतु आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी सापडली नाही.
त्यानंतर व्हायरल फोटोतील व्यक्ती नेमकी कोण हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला अहमद खान यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ११ डिसेंबर २०१५ रोजी अपलोड हाच फोटो अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. फोटोच्या कॅप्शननुसार जो बायडन अमेरिकेचे उप-राष्ट्रपती असताना त्यांच्या निवासस्थानी हा फोटो घेण्यात आला होता.
सोशल मीडियावर व्हायरल फोटोत जो बायडन यांच्या बरोबर दिसणारी व्यक्ती अहमद खान हेच असल्याचे परंतु हा फोटो सध्याचा नसून साधारणतः ५ वर्षांपूर्वीचा असल्याचे यातून स्पष्ट झाले. सहाजिकच या फोटोचा २०२० सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
आम्हाला फॅक्ट चेक वेबसाईट ‘बूम’च्या रिपोर्टमध्ये अहमद खान यांची प्रतिक्रिया देखील मिळाली. यात अहमद खान यांनी सोशल मीडियावरील दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. अनेकजन जुने फोटो गैरसमजातून शेअर करत असावेत, असं त्यांनी म्हटलंय.
रिपोर्टनुसार अहमद खान यांनी ‘ड्राफ्ट बायडन २०१६’ या मोहिमेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बायडन यांच्या नावासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती आणि पाठिंबा यांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने हे अभियान चालविण्यात आले होते. पुढे बायडन यांनी ही निवडणूक लढवली नाही. परंतु ‘ड्राफ्ट बायडन २०१६’च्या टीमने केलेल्या उत्तम कामाच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमातील हा फोटो आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दाव्यांप्रमाणे अहमद खान यांची अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही.
व्हायरल फोटोमधील व्यक्ती अहमद खान हेच असले तरी व्हायरल फोटोज ५ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांचा सध्याच्या अमेरिकेतील राजकीय घडामोडींशी संबंध नाही.
हे ही वाचा- डाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलंय?
[…] […]