सोशल मीडियावर पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तिकिटाच्या वरच्या भागावर ‘अडाणी रेल्वे’ आणि त्याच्या खालच्या बाजूला ‘रेल्वे ही अदानी समूहाची खासगी मालमत्ता आहे’ असे लिहिलेले दिसतेय. या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये असल्याचं देखील दिसून येतंय. (Pune platform ticket at rs 50) दावा केला जातोय की भारतीय रेल्वे आता अदानी समूहाच्या ताब्यात गेली असून ती गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यात राहिलेली नाही.
पडताळणी:
भारतीय रेल्वे अदानी समूहाच्या ताब्यात गेली असल्याच्या कुठल्याही बातम्या माध्यमांमध्ये नाहीत. त्यामुळे लगेचच व्हायरल दावा संशयास्पद वाटतो. म्हणून मग रेल्वे मंत्रालयाने याबाबत काही खुलासा केलाय का हे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वे विभागाच्या वेबसाईट किंवा ट्विटर अकाऊंटवर या संबंधीची कुठलीही माहिती मिळाली नाही.
त्यानंतर व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘वन इंडिया हिंदी’च्या वेबसाईटवर दि. २८ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित बातमी वाचण्यात आली. या बातमीमध्ये सरकारने भारतीय रेल्वे अदानी समूहाला विकली असल्याचा दावा चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आम्हाला ‘रेल्वे स्पोकपर्सन’ या अधिकृत ट्विटर हँडलवरून ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. पत्रकार प्रशांत कनौजिया यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा फोटो अपलोड करून ५ रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाले असल्याचा दावा केला होता.
प्रशांत कनौजिया यांच्या या ट्विटच्या प्रत्यूत्तरात रेल्वेच्या प्रवक्त्याकडून एक ट्विट केलं गेलं होतं. कोविडच्या काळात अनावश्यक प्रवाशांची रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देश्याने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये (Pune platform ticket at rs 50) करण्यात आल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
सध्या व्हायरल होत असलेला फोटो बारकाईने बघितला असता लक्षात आले की सध्याचे व्हायरल तिकीट हे ऑगस्ट २०२० मध्ये वेगळ्या दाव्यानिशी व्हायरल झालेल्या तिकिटापेक्षा बिलकुल वेगळे नाही. दोन्हीही फोटो एकाच तिकिटाचे आहेत. तिकिटावरील तारखेच्या आणि वेळेच्या माहितीवरून ते अगदी सहज लक्षात येतं.
तुलनात्मक फोटो:
सध्या व्हायरल होत असलेल्या तिकिटातील ‘अदानी रेल्वे’ आणि ‘रेल्वे ही अदानी समूहाची खासगी मालमत्ता आहे’ अशा प्रकारचा मेसेज मात्र मूळ तिकिटावर नाही. म्हणजेच मूळ तिकीटाशी छेडछाड करण्यात आली असल्याची गोष्ट इथेच स्पष्ट होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भारत सरकारने भारतीय रेल्वे अदानी समूहास विकल्याच्या दाव्यांना काहीएक अर्थ नाही. पुणे स्थानकाच्या ऑगस्ट २०२० मधील तिकिटाशी छेडछाड करून त्यामध्ये ‘अदानी रेल्वे’ आणि ‘रेल्वे ही अदानी समूहाची खासगी मालमत्ता आहे’ अशा आशयाचे मेसेजेस जोडण्यात आले आहेत.
कोरोना काळात स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये. तसेच सोशल डीस्टन्सिंग योग्यरीत्या राखता यावं याकरिता पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते. त्याचा अदानी समूहाशी काहीएक संबंध नाही.
हे ही वाचा– नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?
[…] हे ही वाचा- अदानी समूहाने पुणे जंक्शनच्या प्लॅटफ… […]