Press "Enter" to skip to content

पंजाब ‘आप’ सरकारने माजी आमदारांची पेन्शन बंद केल्याचे व्हायरल दावे फेक! वाचा सत्य!

आम आदमी पक्षाचा (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सत्तेवर येताच मोठमोठे निर्णय घेतल्याचे किंवा प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. त्यातीलच एक मोठी बाब म्हणून पंजाबच्या माजी आमदारांची, मंत्र्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतेय.

Advertisement

‘पंजाब सरकार का बड़ा फैसला पूर्व विधायक व मंत्रियों की पेंशन बंद’ असे दावे व्हायरल होताना दिसतायेत.

उत्तर प्रदेश शार्वस्ती विभागातील आम आदमी पक्षाच्या ट्विटर हँडलवरूनही हेच दावे करण्यात आले आहेत.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अभिजित चव्हाण, सुहास देशपांडे, ए डी चुरी, निशिकांत गोळे, यशवंत पाटील, निलेश घरत, नागेश भांगारे आणि शिवाजी संगापुडे यांनी फेसबुक, ट्विटर प्रमाणेच व्हॉट्सऍपवरही सदर दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

माजी आमदार, मंत्र्यांचे निवृत्ती वेतन बंद करण्याचा निर्णय जाहीर करणे हा खरोखर खूप मोठा आणि धाडसी निर्णय आहे. या निर्णयाची सर्व माध्यमांनी दखल घेतली असणारच असे गृहीत धरून ‘चेकपोस्ट मराठी’ने विविध कीवर्ड्सच्या माध्यमातून गुगल सर्च करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला अशा प्रकारची एकही बातमी आढळली नाही.

परंतु आम्हाला याच संदर्भातील ‘One MLA, One Pension’ नावाची दुसरी एक बाब प्रस्तावित असल्याचे समजले.

काय आहे ‘One MLA, One Pension’ ?

‘ट्रिब्युन इंडिया’च्या बातमीनुसार पंजाबमधील आप सरकार एका आमदारास केवळ एकच पेन्शन मिळावी यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज घडीला आमदार म्हणून एकदा निवडून येणाऱ्या व्यक्तीस आयुष्यभरासाठी दरमहा ७५१५० रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. तोच आमदार जर एक पेक्षा अधिक वेळा निवडून आला असेल, तर त्या प्रत्येक टर्मच्या पेन्शनची ६६% रक्कम त्याला दरमहा मिळते.

बातमीनुसार माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, कॉंग्रेस नेते लाल सिंह, माजी मंत्री सर्वन सिंह फिल्लौर यांना दरमहा ३.२५ लाख रुपये पेन्शन रक्कम म्हणून मिळतात. ज्येष्ठ नेते बीएस भुंडर यांना दरमहा २.७५ लाख रुपये तर एस एस धिंडसा यांना २.२५ लाख रुपये निवृत्ती वेतनाच्या स्वरुपात मिळत असतात.

माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची पेन्शन विषयक विनंती:

तब्बल ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांनी सरकारकडे त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम लोकोपयोगी कामासाठी वापरावी अशी विनंती केलीय. त्यांना मिळणारी दरमहा रक्कम ५,७६,१५० रुपये एवढी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नव्या सरकारने माजी आमदार आणि मंत्र्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. व्हायरल दावे फेक आहेत.

दरम्यान, आमदारांच्या निवृत्ती वेतनावर मर्यादा आणणारा निर्णय मात्र प्रस्तावित आहे. आप सरकार एका आमदारास एकच पेन्शन मिळावी यासाठी ‘One MLA, One Pension’ आणण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने खासदार आमदारांच्या पेन्शन बंद करण्याचा निकाल सुनावला?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा