Press "Enter" to skip to content

सरकार खादीचे ३ मास्क ९९९ रुपयांना विकत नाहीये, व्हायरल दावा फेक!

सोशल मिडीयावर दावा करण्यात येतोय की सरकारकडून खादीचे ३ मास्क ९९९ रुपयांना विकण्यात येताहेत.   

९९९ रुपये किंमत असणारे खादीचे मास्क. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खादीचा चरखा तसेच ‘मेक इन इंडिया’चा लोगो यासह एक ग्राफिक शेअर करण्यात येतंय.

गरिबी, बेरोजगारी यांसारख्या समस्या लक्षात घेता सरकार खादीचे ३ मास्क केवळ ९९९ रुपयांमध्ये विकत असल्याचा दावा करण्यात येतोय.

ट्वीटरवर युजर्स गणिती समीकरणं मांडत एका मास्कमागे सरकारचा नफा देखील मोजत आहेत.

फेसबुकवर देखील हाच दावा करण्यात येतोय.

पडताळणी :

खादीचे कपडे महागडे असतात असा समज आपल्याकडे आहेच पण खादीच्या मास्कमध्ये नेमकं असं काय की ३ मास्क ९९९ रुपयांना विकले जाताहेत हे शोधण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली.

आम्ही सर्वप्रथम खादी मास्कची माहिती शोधली त्यावेळी आम्हाला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं ९ जुलै रोजीचं ट्वीट मिळालं. या ट्वीटमध्ये त्यांनी खादी इंडिया मार्फत बनविण्यात आलेल्या खादी मास्कची ऑनलाईन विक्री सुरु झाल्याची माहिती दिली होती.

ट्वीटनुसार सुती मास्कची किंमत  ३० रुपये तर सिल्क मास्कची किंमत १०० रुपये ठरविण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.    

त्यानंतर आम्हाला ‘खादी इंडिया’च्या अधिकृत ट्वीटर हँडलवर देखील एक ट्वीट मिळालं. ज्यात स्पष्ट करण्यात आलंय की खादीच्या नावाखाली महागडे मास्क विकले जात आहेत. त्याला बळी पडू नकात. अस्सल खादीचे मास्क ३० रुपयांपासून विक्रीस उपलब्ध असून खादीच्या वेबसाईटवरून त्यांची ऑनलाईन खरेदी केली जाऊ शकते.

आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला ‘एनडीटीव्ही इंडिया’च्या वेबसाईटवर ‘पीटीआय’ची बातमी सापडली. या बातमीनुसार प्रधानमंत्र्यांचे फोटो लावलेले नकली ‘खादी मास्क’ विकणाऱ्या चंदिगढमधील महिला विक्रेतीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीविषयी खादी इंडियाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले की, “आम्ही खादीच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या आणि पंतप्रधानाच्या फोटोजचा अनधिकृतरीत्या जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या कुठल्याही व्यक्ती अथवा खासगी संस्थेला सोडणार नाही. हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. आम्ही भूतकाळात देखील अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली आहे.”

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सरकारकडून खादीचे ३ मास्क ९९९ रुपयांमध्ये विकून जनतेची लूट करण्यात येत असल्याचा दावा फेक आहे.

‘खादी इंडिया’कडून सादर करण्यात आलेल्या मास्कची किंमत ३० रुपयांपासून सुरु होते आणि हे मास्क खादी इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीस उपलब्ध आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, खादी इंडिया, मेक इन इंडिया यांच्या लोगोचा अनधिकृतरित्या वापर करून आपलं उत्पादन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला विरोधात चंदिगढमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा- कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा