कोरोना संसर्गामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या विधवांसाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे जिजाऊ/जिजामाता योजना (jijau jijamata yojana corona) सुरु करण्यात आली असून योजनेअंतर्गत वार्षिक ५० हजार निधी देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करून काही लोकांचे संपर्क क्रमांक देण्यात येताहेत.
या प्रकारचे मेसेज फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अर्थातच व्हॉट्सऍप देखील यास अपवाद नाही. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दयानंद यांनी याविषयीची माहिती दिली आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- मेसेज मधील फोन नंबर बंद:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी त्यात असणाऱ्या नंबर्सवर कॉल करून पाहिला. फोन लागला नाहीच परंतु ते सीम बंद असल्याचं सांगणारा IVRची टोन गुजराती भाषेत होती. ‘ट्रू कॉलर’या ऍपने सदर नंबर स्कॅम असल्याचे दर्शवले. हास्यास्पद बाब म्हणजे ‘ट्रू कॉलर’ प्रोफाईलवर वापरकर्त्याने ‘सीम हरवला आहे’ असे लिहून ठेवलेय जेणेकरून कुठल्याही कायदेशीर कारवाईपासून वाचण्याची शक्यता निर्माण होईल.
- ‘राजमाता जिजाऊ’ नावाची योजना वेगळीच
महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा तेथे उल्लेख असलेल्या राजमाता जिजाऊ योजनेविषयीची सविस्तर माहिती मिळाली.
‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन’ द्वारे महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या १००० दिवस म्हणजेच वजा ९ ते २४ महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते.
या मिशनने विविध विभांगासाठी बहु-क्षेत्रीय कृती कार्यक्रम तयार केला आहे, ज्यात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध विभाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कसे सहाय्य करू शकतात याचा आराखडा दिलेला आहे.
- तशी कुठलीच योजना अस्तित्वात नाही
संबंधित दाव्याची पडताळणी करताना आम्हाला महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत ‘जिल्हा महिला व बालविकास अधिकारी’ यांना पाठवण्यात आलेले एक पत्रक मिळाले. यानुसार ‘जिजाऊ/जिजामाता’ या नावाने (jijau jijamata yojana corona) कुठलीही अशी योजना शासनाने चालू केली नाही की ज्यात कोरोनामुळे विधवा झालेल्या स्त्रीला वार्षिक ५०००० रुपये मिळतील. सदर दावे फेक असल्याचे त्या पत्रकात लिहिले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासनातर्फे वार्षिक ५० हजार रुपये मिळवून देणारी अशी कुठलीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक कागदपत्रे किंवा पैसे कुणासही सोपवू नयेत याने आपली फसवणूक होऊ शकते.
हे ही वाचा: कोरोना मृतांच्या अनाथ मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करणारे व्हायरल मेसेजेस फेक!
[…] हेही वाचा: कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना श… […]