सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. फोटोत काँग्रेसचे पदाधिकारी दिसताहेत. या फोटोतील महिला हाथरस प्रकरणातील डॉ. राजकुमारी बंसल उर्फ हाथरस नक्सल भाभी (hathras naxal bhabhi) असल्याचा दावा करण्यात येतोय. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हाथरसला गेल्यानंतर याच महिलेची गळाभेट घेतली होती असं देखील सांगितलं जातंय.
राजकुमारी बंसल जबलपूर येथील मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आहेत. हाथरस प्रकरणाच्या सुरुवातीच्या काळात काही चॅनेल्सकडून बंसल हाथरस पीडितेच्या वहिनी असल्याचा दावा करण्यात आला होता. नंतर मात्र त्यांचं पीडितेशी कसलंही नातं नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे उजव्या विचारधारेशी संबंधितांकडून डॉ. राजकुमारी बंसल यांचा उल्लेख ‘नक्सली भाभी’ (hathras naxal bhabhi) असा केला जातोय. बंसल यांच्यावर नक्सलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय.
अरुण पुदुर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केलाय. त्यांनी थेटपणे दावा केला नसला तरी ते हीच गोष्ट सुचवू बघताहेत की गोवा प्रदेश काँग्रेस काँग्रेस समितीच्या व्यासपीठावरील महिला डॉ. राजकुमारी बंसल उर्फ नक्सल भाभी आहे.
इतरही अनेक युजर्सकडून हा फोटो याच दाव्यासह शेअर केला जातोय. चयन चॅटर्जी या युजरकडून पोस्ट करण्यात आलेला हा फोटो जवळपास ३४०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.
पडताळणी:
व्हायरल फोटोत दिसणारी महिला नेमकी कोण हे शोधताना आम्हाला ट्विटरवर एक ट्विट मिळालं. ट्विटनुसार व्हायरल फोटोत दिसणारी महिला डॉ. राजकुमारी बंसल नसून गोवा काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा बोरकर असल्याचं सांगण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी आम्ही फेसबुकवर प्रतिभा बोरकर यांचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला याच नावाचं फेसबुक अकाउंट सापडलं. विशेष म्हणजे या अकाउंटचा कव्हर फोटो देखील तोच आहे, जो सध्या नक्सल भाभी म्हणून व्हायरल करण्यात येतोय. याचा एक अर्थ असा देखील होतो की व्हायरल करण्यासाठी निवडण्यात आलेला फोटो प्रतिभा बोरकर यांच्याच अकाऊंटवरून घेण्यात आला असावा.
व्हायरल फोटो २९ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतील असून गोवा काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ मिळाला. या व्हिडिओत देखील आपल्याला प्रतिभा बोरकर दिसून येतील.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी हाथरस मध्ये गळाभेट घेतलेली महिला देखील डॉ. राजकुमारी बंसल नसून हाथरस पीडितेची आई असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. शिवाय प्रियांका गांधी हाथरसमध्ये असताना आपण हाथरस मध्ये नव्हतोच असं डॉ. राजकुमारी बंसल यांनी देखील ‘बूम लाईव्ह’शी बोलताना सांगितलेलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल फोटोतील महिला डॉ. राजकुमारी बंसल नसून गोवा काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा बोरकर आहेत. व्हायरल फोटो सध्याचा नसून गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील गोवा काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतील आहे.
हे ही वाचा- खरंच काँग्रेस सरकारच्या काळात कसाबला बिर्याणी देण्यात आली होती?
[…] हे ही वाचा- गोवा काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा बोर… […]