Press "Enter" to skip to content

टाळ्या-फुलांनी स्वागत होणारी व्हायरल व्हिडीओतील मुलगी ‘हाथरस’ पीडिता नाही!

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण देशभर गाजत असताना सोशल मिडिया खऱ्या-खोट्या दाव्यांनी आणि आरोप प्रत्यारोपांनी भरभरून वाहतोय. असाच एका तरुणीच्या टाळ्या आणि फुलांच्या स्वागताचा व्हिडीओ (hathras victim video) हाथरस पिडीतेचा असल्याचे म्हणत व्हायरल होतोय.

Advertisement

‘हाथरस_की_बेटी_####### पढ़ाई मे टॉपर भी थी ओर जो स्वागत हुआ देखने लायक था…ये वो ही बेटी हैं जिसका गेंगरेप कर के जीभ काटकर और आँखे एवं शरीर को जख्म करके हत्या कर दी थी 👇🏽#आवाज_उठाना_मेरा_कर्तव्य_हैं या अशा हिंदीतील आणि ‘मनिषा वाल्मिकी, हाथरस युपी परिक्षेत पहिली आली होती. बघा तिचा आत्मउत्साह आणि स्वागत सोहळा…’ या अशा मराठी कॅप्शनसह तो व्हिडीओ व्हायरल होतोय.

प्रियांका गौतम या फेसबुक युजरच्या पोस्टला तब्बल १५ हजार लोकांनी शेअर केले आहे.

Hathras Manisha College Topper Viral videos on facebook Checkpost Marathi
Source: Facebook

हेच व्हिडीओज साधारण अशाच कॅप्शनसह व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल झाले आहेत. या संबंधी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी, प्रशांत कारखानीस, सुनील गिरकर, प्रमोद अहिरे आणि यशवंत पाटील या सुज्ञ वाचकांना सदर व्हिडीओच्या सत्यतेबद्दल शंका आल्याने त्यांनी आमच्याकडे शहानिशा करण्याची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सदर व्हायरल व्हिडीओच्या कीफ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्यानंतर या व्हायरल व्हिडीओचे (hathras victim video) मूळ व्हर्जन असलेला व्हिडीओ आम्हाला सापडला आणि सत्य समजणे सोपे झाले.

नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा इव्हेंट:

मूळ व्हिडीओ ‘एम डी आदिल फयाझ’ या युट्युब चॅनलवर १९ फेब्रुवारी २०२० रोजी अपलोड झाल्याचे आढळले. म्हणजे हाथरस प्रकरणाच्या जवळपास ७ ते ८ महिने अगोदर.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘GO DIAMOND ROYAL TIGER TEAM MAHABUBNAGAR’ असे लिहिलेले आढळले. या कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला तेव्हा लक्षात आले की हा हैदराबादच्या ‘सेफ शॉप‘ नावाच्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा इव्हेंट आहे.

एका विशिष्ट सेल्सपर्यंत पोहचल्यानंतर या प्रकारे नेटवर्क मार्केटिंग कंपनी त्या व्यक्तीला डायमंड, गोल्ड, सिल्व्हर असे टॅग देतात आणि इव्हेंट्स मध्ये त्यांचे अशा पद्धतीने स्वागत केले जाते. याच प्रकारे दुसऱ्या कंपन्यांचे असेच दोन्ही बाजूने उभे राहात फुल वगैरे देऊन स्वागत होतानाचे अनेक व्हिडीओज युट्युबवर उपलब्ध आहेत.

पिडीतेच्या शिक्षणाचे सत्य:

दैनिक भास्कर ग्रुपचे मराठी वृत्तपत्र असलेल्या दैनिक दिव्य मराठीमध्ये पूनम कौशल यांचा ‘सफदरगंज हॉस्पिटल ते हाथरस..’ हा ग्राउंड रिपोर्ट असणारा लेख प्रसिद्ध झाला होता. यामध्ये पूनम यांनी पिडीतेचे गाव आणि तेथील सामाजिक परिस्थितीचा ‘आंखोदेखा हाल’ त्या लेखात नमूद केला आहे.

“पिडीत तरुणीबद्दल गावातलं मत चांगल असल्याचं जाणवलं. ती एक अतिशय साधी पोरगी होती. घरातून बाहेर फारशी पडत नव्हती. कधीकधी आईसोबत गवत कापण्यासाठी आणि चारा आणण्यासाठी शेतावर कामाला जायची. तेव्हाही ती कुणाशी बोलत नसे. शाळा-कॉलेजात तर कधी गेलीच नाही त्यामुळे बाहेरच्या दुनियादारीची समज तिच्यात जराही नव्हती. मात्र तिच्या मृत्यूनंतर आता इथल्या दलित कुटुंबाच्या मुलींमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यातील एकीशी बोलण्याचा मी प्रयत्न केला, तर अतिशय घाबरलेल्या स्वरात ती म्हणाली,””‘इतनी अच्छी दीदी के साथ इतना बुरा हुआ। अब कौन लड़की खेत की ओर जाने की हिम्मत करेगी। लेकिन जाना तो है ही। ढोर भूखे तो मरेंगे नहीं।’” या शब्दात त्यांनी पिडीतेच्या एकूणच शिक्षण आणि बाहेरील वावराबद्दल उल्लेख केला आहे.

‘ईंडीयन एक्स्प्रेस‘ सोबत बोलताना पिडीत तरुणीची आई सुद्धा हेच म्हणत होती की ‘अगदी प्राथमिक शाळेत जायला सुद्धा तिला हायवे ओलांडून जावं लागायचं. ज्यावर भरधाव वेगाने मोठमोठ्या गाड्या यायच्या. एखाद्या कार ने धडक दिली, कुणी अपहरण केलं तर काय? या अशा भीतीनेच आम्ही तिला शाळेतून काढून टाकलं. तिच्या विषयीआम्ही खूप काळजीने वागलो पण शेवटी जे नको तेच झालं. आम्ही तिला नाही वाचवू शकलो.’

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओचा आणि उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या घटनेतील पीडीतेचा काहीएक संबंध नाही.

पिडीतेचा म्हणून लाल रंगातील ड्रेसमध्ये असणाऱ्या ज्या मुलीचा फोटो व्हायरल होत होता त्याच्याशीच मिळताजुळता व्हिडीओ शोधून कुणीतरी सदर व्हिडीओ व्हायरल केला असण्याची शक्यता आहे. परंतु खरे पाहता तो फोटोसुद्धा फेक असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’ने स्पष्ट केले होते.

त्याविषयी पडताळणी: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा म्हणून हा फोटो शेअर करताय? थांबा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा