गॅस सिलिंडरला एक्सपायरी डेट असल्याचे दावे करणारं एक ग्राफिक्स अनेक वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत असतं.
सिलिंडरची एक्सपायरी डेट असते आणि ती कशी ओळखायची हे सुद्धा यात सांगितलेलं आहे. फेसबुक, व्हाट्सअपवर एरवी फिरणारी पोस्ट आता ‘हेलो’ नावाच्या ऍपवर फिरू लागली आहे.
पडताळणी:
गॅस सिलेंडर ही घरातली सर्वात मोठी जीवनावश्यक वस्तू. परंतु तेवढीच धोकादायक सुद्धा. त्यामुळे त्याबाबत असणारे समज गैरसमज पडताळणे गरजेचे आहेत. फिरणाऱ्या दाव्यांबाबत ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी केली.
सर्वात आधी योग्य ते किवर्ड्स वापरून गुगल सर्च केलं. त्यावेळी आम्हाला ‘झी न्यूज’ची बातमी सापडली; ज्यात वर सांगितलेल्या दाव्या प्रमाणेच माहिती दिली होती. अशीच बातमी दैनिक भास्करची सुद्धा सापडली.
परंतु त्याच वेळी आम्हाला ‘द हिंदू’ची एक बातमी सापडली जिच्या हेडलाईनमध्येच लिहिलं होतं ‘No expiry dates for LPG cylinders’
वेगवेगळी माध्यमं वेगवेगळी माहिती देत असताना आम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने रिसर्च चालू केला आणि आमच्या हाती IOCL म्हणजेच ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर स्टेटमेंट सापडलं.
या स्टेटमेंटचं शिर्षकच ‘There is no Expiry date for LPG cylinders, only test due date’ असं आहे. यातच सर्व समजून जाईल.
या स्टेटमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे ‘सामान्यतः ‘एक्सपायरी’ हा शब्द एखाद्या गोष्टीचं आयुष्य सांगण्यासाठी वापरला जातो. परंतु सिलेंडरचं असं नसतं त्याची क्षमता तापमान, वातावरण, प्रेशर या बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळेच सिलेंडरला ‘एक्सपायरी’ डेट असते असं म्हणणंच चुकीचं आहे.’
मग ही ‘ड्यु डेट’ काय आहे?
ज्या वेळी सिलिंडर भरला जातो तेव्हा आधी तो तपासूनच मग भरणं गरजेचं आहे. तरीही प्रत्येक सिलेंडरवर एक विशिष्ट तारीख लिहिली जाते त्यावेळी त्याची तपासणी करणे गरजेचे असते. त्या तारखेनुसार ते सिलिंडर रिफिलिंग प्लांट मध्ये बाजूला काढले जातात. त्यांची तपासणी केली जाते, पुन्हा वापरण्या योग्य असणारे बाजूला काढून रंग देऊन नव्या तारखेचे शिक्के मारले जातात. व्हायरल ग्राफीकमध्ये दिल्याप्रमाणेच साल आणि महिन्याचे सूत्र त्यावर असते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये व्हायरल दाव्यात असलेली अर्धी माहिती चुकीची आढळली. म्हणजेच ‘एक्सपायरी’ डेट म्हणत जी माहिती दिली आहे ती ‘ड्यु डेट’ची आहे. या दिवशी सिलिंडर पूर्णतः निकामी होतो असे नाही तर त्याची तपासणी करण्याची अंदाजित वेळ आलेली असते.
सिलिंडरच्या व्हॉल्व्ह मध्ये पाणी टाकून बुडबुडे येत असतील तर तो लिक आहे, तो एजन्सीला मागे द्यायला हवा. जर या टेस्टमध्ये तो पास झाला असेल आणि त्यावरची ‘ड्यु डेट’ दूरची असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही.
[…] […]