देशभरात नुकतीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती (Ambedkar Jayanti) साजरी करण्यात आली. यावर्षीच्या आंबेडकर जयंतीवर देखील कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचे सावट बघायला मिळाले. अनेक ठिकाणी साधेपणाने आंबेडकर जयंतीचा उत्सव साजरा झालेला बघायला मिळाला, तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील आढळून आले.
सध्या मात्र सोशल मीडियावर भीम जयंती उत्सवाचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय आणि निळ्या रंगाचे झेंडे दिसताहेत. या फोटोतील गर्दीची तुलना कुंभमेळ्यातील गर्दीशी केली जातेय.
या फोटोच्या संदर्भात सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा प्रसार होतोय म्हणून गळे काढणाऱ्यांना आंबेडकर जयंतीच्या या गर्दीमध्ये मात्र कोरोना दिसत नाही.
पडताळणी:
व्हायरल फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला 7 AIMS या युट्यूब चॅनेलवर 24 एप्रिल 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ मिळाला. सोशल मीडियात सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमधील दृश्य आणि या व्हिडिओतील दृश्य एकमेकांशी हुबेहूब जुळत असल्याचे आढळून आले.
व्हायरल फोटो आपण व्यवस्थितरीत्या निरीक्षण करून बघितला तर या फोटोमध्ये ‘आनंद बौद्ध मंडळ’ असे लिहिलेले बॅनर बघायला मिळेल. हेच बॅनर युट्युब व्हिडिओमध्ये देखील बघायला मिळते. तसेच फोटोमध्ये दिसत असलेले ‘रेमंड’चे शोरूम देखील या व्हिडिओमध्ये बघायला मिळते.
सहाजिकच सध्याचा व्हायरल फोटो आणि युट्युबवरील व्हिडीओ हे एकाच ‘आंबेडकर जयंती’ उत्सवाचे असल्याचे स्पष्ट होते आणि युट्यूब व्हिडीओ यावर्षीच्या आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti) उत्सवाचा नसून २०१७ सालचा आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या संदर्भाने शेअर केला जात असलेला आंबेडकर जयंतीचा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. व्हायरल फोटो यावर्षीचा म्हणजेच कोरोना काळातील निर्बंधा दरम्यानचा नसून, २०१७ मधील भीम जयंती उत्सवाचा म्हणजेच साधारणतः ४ वर्षांपूर्वीचा आहे.
हे ही वाचा- विलासराव देशमुखांच्या बालपणीचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून व्हायरल!
Be First to Comment