दुकानदाराने १०० वडापाव फुकट न दिल्याच्या कारणावरून शिवसेना पदाधिकाऱ्याने त्यास बांबूने बेदम मारहाण केल्याच्या बातमीचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार फिरतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र आंग्रे, दिनेश सूर्यवंशी आणि भूषण पराडकर यांनी व्हॉट्सऍपवर हे दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. हाच व्हिडीओ ट्विटर आणि फेसबुकवरही जोरदार व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल होत असणारा व्हिडीओ ‘IBN लोकमत’चा आहे, परंतु २०१७ सालापासून या वाहिनीचे ‘न्यूज १८’ लोकमत असे नामकरण झाले आहे. त्यामुळे व्हिडीओ नेमका कधीचा ते शोधण्यासाठी यावरूनच शंका आल्याने ‘चेकपोस्ट मराठी’ने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्चच्या आधारे शोध घेतला. या तपासात आम्हाला सदर घटनेच्या विविध न्यूज पोर्टल्सवरील बातम्या आढळल्या. या बातम्यांच्या तारखा २९ फेब्रुवारी २०१६ – १ मार्च २०१६ अशा असल्याचे आढळून आले.
या बातम्यांतील फोटोज आणि व्हायरल बातमीत वापरलेले सीसीटीव्ही फुटेज तंतोतंत जुळणारे आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की शिवसेना पदाधिकाऱ्याने वडापाव फुकट देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याची घटना आताची नसून २०१६ सालची आहे.
तत्कालीन बातम्यांनुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. येऊ घातलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जुने व्हिडीओज नव्याने व्हायरल होत असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ठाकरे सरकारने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुस्लीम युवकांना वेतन चालू केल्याचे दावे चुकीचे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment