मुंबईमधील विनायक हॉस्पिटलमध्ये (Vinayak Hospital) कार्यरत असणाऱ्या डॉ. सुनिता या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरला हॉस्पिटलमध्येच हृदय विकाराचा झटका आला. सर्व यंत्रणा दिमतीला असतानाही त्यांचा मृत्यू झाला. अशा काहीशा मेसेजसह एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल होतेय ज्यामध्ये त्या कोसळताना दिसतायेत.
‘विनायक हॉस्पिटल, मुंबईचे सीसीटीव्ही फुटेज
डॉ. सुनीता , एक हृदयरोग विशेषज्ञ
हॉस्पिटल वॉर्ड राऊंड करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावल्या, तिच्या कर्मचार्यांनाही काहीही करायला वेळ मिळाला नाही.
आयुष्यात काहीही निश्चित नाही..
मला असे वाटत नाही की , या डॉक्टरपेक्षा अधिक त्वरित वैद्यकीय मदत कोणाला मिळू शकेल आणि हृदयरोगतज्ञ असल्याने तिच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जात असतीलच असे गृहीत धरले जाईल….
या दृश्यांकडे पाहून लक्षात येते की काहीही असो, वेळ आली की कोणीही वाचू शकत नाही. ….
म्हणून कुटुंब आणि मित्रांसोबत प्रामाणिक आणि आनंदी जीवन जगा .’
या अशा मेसेजसह सीसीटीव्ही फुटेज दर्शविणारा १.२ मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
हे दावे ट्विटरवरही व्हायरल होतायेत. मुंबई न्यूज या ट्विटर हँडलवरूनही सदर दावे पोस्ट केल्याचे दिसतेय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक ज्ञानेश मगर यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवरही व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केल्यानंतर असे लक्षात आले की हा व्हिडीओ गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियात फिरत आहे. अधिक शोध घेतला असता लक्षात आले की हा व्हिडीओ मुंबईचा नसून बंगळूरूच्या विनायक हॉस्पिटलमधील आहे. फेसबुकवर हाच व्हिडीओ १४ डिसेंबर २०१७ रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये ही घटना बंगळूरु येथील असल्याचे सांगण्यात आले होते.
२६ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘न्यूजफ्लेअर‘ या न्यूज वेबसाईटवरून यासंबंधीचे वृत्त देण्यात आले होते. यामध्ये देखील सदर घटना बंगळूरू येथीलच असल्याचे सांगण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी न्यूजफ्लेअरशी बोलताना सांगितले,
हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर “डॉ. सुनिता यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शक्य तितक्या सर्वोत्तम पद्धतीने उपचार पुरविण्यात आले. हृदयाच्या आतून इंजेक्शन देखील दिले गेले. परंतु त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि यातच त्यांचे निधन झाले. त्यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यांची शुगर लेव्हल वाढली होती. याविषयीची माहिती त्यांनी हॉस्पिटलला दिली नव्हती.”
– डॉ. भारत, प्रवक्ते, विनायक हॉस्पिटल, बंगळूरु
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले की मुंबईच्या विनायक हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडलेली घटना म्हणून व्हायरल होत असलेली सीसीटीव्ही फुटेजची क्लिप २०१७ सालची बंगळूरुच्या विनायक हॉस्पिटलमधील आहे.
हृदयविकाराने निधन झालेल्या डॉक्टरकडून स्वतःच्या इतर शारीरिक आजारांची कल्पना रुग्णालय प्रशासनास देण्यात आलेली नव्हती. या कारणाने सर्व अद्ययावत यंत्रणा हाताशी असताना आणि वेळेवर उपचार मिळूनही त्यांचा जीव वाचवला जाऊ शकला नाही.
हेही वाचा: गाईचे शेण खाणाऱ्या MBBS डॉक्टरला शरीरभर झाले इन्फेक्शन? हॉस्पिटलमध्ये दाखल? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अट… […]
[…] हेही वाचा: हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अट… […]
[…] हेही वाचा: हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरलाच हार्ट अट… […]